कोल्हापुरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम, 28 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसभरात पाच फुटांची वाढ

जिह्यात सर्वत्र विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. शहरात मात्र पावसाची उघडझाप सुरू होती. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल पाच फुटांची वाढ होऊन ती 26 फूट 11 इंच झाली होती, तर 28 बंधारे पाण्याखाली गेले होते. जिह्यात सर्वाधिक पावसाची नोंद आजरा तालुक्यात झाली.

कोल्हापूर जिह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. सध्या धरणांतील पाणीसाठा 50 टक्क्यांपेक्षा कमी असला तरीसुद्धा जोरदार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पंचगंगा नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. बुधवारी 21 फुटांवर असलेली पंचगंगेची पाणीपातळी सध्या 26 फूट 11 इंचावर आली आहे. नदीची इशारा पातळी 39, तर धोका पातळी 43 फूट आहे. आज सकाळी 7च्या अहवालानुसार राधानगरी धरणात 2.97 टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणातून 1200 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आजरा तालुक्यात सर्वाधिक 64.8 मिमी पावसाची नोंद

कोल्हापूर जिह्यात गेल्या 24 तासांत आजरा तालुक्यात सर्वाधिक 64.8 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर हातकणंगले-1, शिरोळ -0.5, पन्हाळा – 13, शाहूवाडी – 19.6, राधानगरी – 40, गगनबावडा – 63.8,  करवीर – 3.6, कागल – 6.3, गडहिंग्लज – 17.8, भुदरगड – 55 आणि चंदगड तालुक्यात 58.9 मि.मी. पाऊस झाला आहे. जिह्यात एकूण 22.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.