Kolhapur news – स्मार्ट-प्रीपेड मीटरची सक्ती नको; शिवसैनिकांची कंदील घेऊन महावितरणवर धडक

जनतेतून थेट विरोध असतानाही महाराष्ट्र शासन घरगुती वीज ग्राहकांना अदानी एनर्जी सोल्युशन या कंपनीकरवी स्मार्ट-प्रीपेड मीटरची सक्ती करत आहे. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी कंदील घेऊन महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी शासन आणि महावितरणविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, वीज ग्राहकांना स्मार्ट आणि प्रीपेड मीटरची सक्ती करण्यात येऊ नये; अन्यथा दांडके हातात घेऊन ठोकून काढू, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला. यासंदर्भात मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी निवेदन स्वीकारले.

घरगुती वीज ग्राहकांना अदानी एनर्जी सोल्युशन या कंपनीकरवी स्मार्ट मीटर व प्रीपेड मीटर स्मार्ट करून, जिल्ह्यात बसवत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यात एकूण 12 लाख 50 हजार 945 वीज ग्राहक आहेत. त्यापैकी 9 लाख 42 हजार 321 घरगुती ग्राहक आहेत. महाराष्ट्रात स्मार्ट व प्रीपेड मीटरला सर्व थरांतून विरोध झाला आहे. राज्यासह देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. त्यातच भर म्हणून स्मार्ट व प्रीपेड वीजमीटरची सक्ती होत आहे. तसेच एकूण महाराष्ट्रात 2.25 कोटी मीटर्ससाठी टेंडर काढण्यात आली आहेत. त्यापैकी 2 टेंडर 1.16 कोटी मीटर्स अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीला दिली आहेत. 2 टेंडर्स 17 लाख मीटर्स एनसीसी कंपनीला दिली आहेत. एक टेंडर 30 लाख मीटर्स माँटेकालो व टेंडर 22 लाख मीटर्स जीनस याप्रमाणे टेंडर मंजूर करण्यात आली आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जाहीर झालेल्या माहितीनुसार पुरवठादार कंपनीपैकी इलेक्ट्रॉल बॉण्डद्वारे एनसीसी कंपनीने भाजपला 60 कोटी रुपयांचे, जीनस कंपनीने 27.5 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉण्ड दिले आहेत. मग यावरील कंपन्यांची स्मार्ट व प्रीपेड मीटर घेण्यास विश्वासार्हता आहे का? असा सवाल करत स्मार्ट व प्रीपेड मीटर घरगुती ग्राहकाला बसवणे त्वरित बंद करावे, अशी मागणी केली.

यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, विराज पाटील, विनोद खोत उपस्थित होते