मुश्रीफसाहेब, कोल्हापूरकरांना जवाब द्या; अन्यथा राजीनामा द्या! शिवसेनेचा इशारा

‘कोल्हापूरला प्रत्येक निर्णयाची प्रयोगशाळा समजून केवळ निधीच्या घोषणांची सवय लावून गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या अनेक घोषणा करणाऱ्या महायुतीच्या कोल्हापुरातील अकार्यक्षम पालकमंत्र्यांच्या यादीत मुश्रीफसाहेब, तुमचादेखील समावेश करावा का?’ असा सवाल करीत ‘मुश्रीफसाहेब, जवाब दो… अन्यथा राजीनामा द्या,’ असे शिवसैनिकांनी ठणकावले. तर, येत्या 6 जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसून पालकमंत्र्यांना जाब विचारू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, आपल्याविरोधात ‘जवाब दो’ आंदोलन छेडण्यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रलंबित सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा करण्यास त्वरित बैठक आयोजित करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, मंजित माने उपस्थित होते.

संजय पवार म्हणाले, ‘कामाचा प्रचंड आवाका, दांडगा जनसंपर्क यांमुळे पालकमंत्री झालेले मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, काही घडामोडींनंतर आपण जुमलेबाजांच्या वळचणीखाली गेलात. दुर्दैवाने तुम्हाला देखील या जुमलेखोर व गद्दारसेनेची निव्वळ घोषणा करून संपूर्ण जनतेला अंधारात ठेवायची सवय लागली आहे का? ‘टक्केवारी’साठी काम रखडले काय?’ असे अनेक सवाल पवार यांनी उपस्थित केले. मोठा गाजावाजा करीत शुभारंभ झालेली 100 कोटी रुपयांची रस्ते योजना आज पावसाळ्यात ठप्प पडली आहे. वादग्रस्त ठेकेदारांच्या साखळीमुळे रस्त्याच्या दर्जाची जबाबदारी कोण घेणार? गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या अमृत योजनेचे काम भाजपच्या एका मंत्र्याच्या संबंधितांकडे असल्याने त्यावर प्रशासन कारवाई करीत नाही. पंचगंगा नदी, रंकाळा तलावाच्या प्रदूषणाबाबत कोणालाच सोयर-सुतक नाही. शिवाय शक्तिपीठ महामार्ग कोणासाठी? जनतेचा विरोध असूनही रद्द का केला जात नाही? आदी अनेक समस्यांची जंत्रीच जाहीर करीत संजय पवार यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांचा समाचार घेतला. तसेच ‘सीपीआर’मधील औषध घोटाळा, कचऱ्याची समस्या आदी प्रश्नांकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

शाहूंची 150वी जयंती सरकारने वर्षभर साजरी करावी – देवणे

‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज शतकोत्तर सुवर्णजयंती साजरी होत असताना, याबाबत शासन उदासीन आहे. उलट केंद्र आणि राज्य सरकारने मिळून वर्षभर राजर्षी शाहूंचे लोककल्याणकारी विचार व योजना देशभरात पोहोचविण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करायला हवे होते,’ अशी भावना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केली.