Kolhapur News – शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीवरून महाविकास आघाडीची निदर्शने; एकनाथ शिंदेंना दाखवले काळे झेंडे

शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीबद्दल निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांवरुन आता घुमजाव करत, शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी कामरा याचे विडंबनात्मक गाणे वाजवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विरोध करण्याचा इशारा आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला होता. मात्र तत्पूर्वीच मध्यरात्रीपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली. समन्वयक गिरीश फोंडे यांना शुक्रवारी सायंकाळी महानगरपालिका शाळेतील नोकरीवरून निलंबित करण्यात आले.

दरम्यान मध्यरात्री पोलिसांनी सर्च वॉरंट काढून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या घराची झडती घेऊन महाविकास आघाडीच्या आंदोलकांवर दडपशाही केली. मात्र सायंकाळी गनिमी काव्याने विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कागल-गिरगाव मार्गावर शेतकऱ्यांनी काळे झेंडे तसेच ऊस दाखवून महायुती सरकारचा निषेध केला.

विधानसभा निवडणूक प्रचारावेळी कोल्हापुरात तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो असे सांगितले होते. तसे अध्यादेशही काढल्याचे सांगितले गेले. तसेच निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे देखील आश्वासनही दिले होते. पण सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने सपशेल घुमजाव केले आहे. या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवण्यासह कुणाल कामरा याचे विडंबनात्मक गाणे लावून विरोध करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवू देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला होता.

दरम्यान महायुती व इंडिया आघाडी तसेच शेतकऱ्यांचे हे आंदोलन महायुती सरकारला चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. हे आंदोलन दडपशाहीच्या जोरावर हाणून पाडण्यासाठी मध्यरात्रीपासूनच आंदोलकांची धरपकड करून अज्ञातस्थळी नेण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.