पंचगंगा स्मशानभूमीत टाळूवरील लोणी खाणारी टोळी, दानपेटीतून डिंकाने चिकटलेल्या काठीने लाखाची रक्कम गायब

जन्म कोठेही व्हावा, पण मरण मात्र कोल्हापूर शहरात व्हावे असे म्हटले जाते. कारण, येथे मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. शेणी, लाकूड दानासह आर्थिक मदत करणाऱ्यांची येथे कमतरता नाही. पण यावेळी पंचगंगा स्मशानभूमीत मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारी यंत्रणा समोर आली आहे.

स्मशानभूमीतील दानपेटीत डिंकाने चिकटलेल्या अनेक नोटा आढळल्या. काठीला डिंक लावून दानपेटीतील नोटा काढण्याचा प्रकार उजेडात आला आहे. यंदा दानपेटीत एक लाख 61 हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे.

महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभूमीपैकी फक्त पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीतच डिंकाने चिकटलेल्या नोटा आढळल्या. या परिसरात तळीरामांचा अड्डा आहे. गांजा ओढणारे टोळके स्मशानभूमीत पडून असते. या टोळक्याकडून दानपेटीतील रक्कम काढली जात असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची येथील सुरक्षेची जबाबदारी आहे. महापालिका स्मशानभूमीतील सर्व खर्च करते. या उपकारातून उपरती म्हणून कोल्हापूरकर स्वयंस्फूर्तीने दानपेटीत दान टाकत असतात. यामागे श्रद्धाही आहे. पण या श्रद्धेवरच घाला घातला जात असल्याचा हा प्रकार आहे. दानपेटीतील रक्कम यंत्रणेच्या डोळ्यांदेखत लुटली जात असेल, तर यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

स्मशानभूमीतील या गुप्तदान पेट्या दरवर्षी मार्चअखेरीस उघडण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमीतील गुप्तदान पेटी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आरोग्य निरीक्षक (स्मशान) सुशांत कांबळे, सूरज घुणकीकर, लेखापाल विभागाचे राजू देवार्डेकर, विजय मिरजे, मुकादम व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. यापूर्वी मार्च 2024 मध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल दोन लाख आठ हजार रुपये जमा झाले होते. यंदा मात्र एक लाख 61 हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे.

कोल्हापुरात प्रशासकीय कामासाठी येता की, ‘तांबड्या-पांढऱ्या ‘वर ताव मारून पर्यटनासाठी? ‘पंचगंगा’ प्रदूषणावरून विभागीय आयुक्तांना कृती समितीचा सवाल

“महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभूमीपैकी फक्त पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत डिंकाने चिकटलेल्या नोटा आढळून येतात. नोटा एकमेकाला चिकटलेल्या असतात. इतर स्मशानभूमीतील दानपेटीत असा प्रकार आढळत नाही.”

डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर मनपा