शिवशंभूद्रोही कोरटकर, केशव वैद्यला सरकार पाठीशी चालतेय; मुख्यमंत्री जबाब दो… आज काळे झेंडे दाखवून कोल्हापूरकर करणार निषेध

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकर आणि केशव वैद्यला महायुती सरकारच पाठीशी घालत आहे. महायुतीचा एकही आमदार, खासदार, मंत्री याविरोधात ‘ब्र’ शब्द काढत नसल्याने आज कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधातील आंदोलनावर ठाम असल्याचा निर्धार कायम असल्याचे इंडिया आघाडी तसेच शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.

प्रशांत कोरटकरला अजूनही अटक होत नसल्याने आक्रमक झालेल्या येथील इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींच्या काँग्रेस कमिटीतील बैठकीत कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जवाब दो… म्हणत काळे झेंडे दाखवून, निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्यासह मराठा समाजाला आव्हानात्मक भाषा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला अटक करण्याऐवजी पोलीस संरक्षण दिले. त्यातूनही तो पळून गेला. राज्यभर कोरटकर विरोधात संतापाची लाट उसळत असतानाही, चार दिवसांपूर्वी कोल्हापुरातील न्यायालयात त्याला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळाला. तरीसुद्धा त्याला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारचा कोरटकरला छुपा पाठिंबा आहे काय? अशी शंका बैठकीत उपस्थित करण्यात आली. आधी प्रशांत कोरटकरला अटक करा. अंतरिम जामीन विरोधात सरकारने उच्च न्यायालयात कारवाई करावी, त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात यावे, असे त्यांना आवाहन करण्यात आले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. इतिहास अभ्यासकांना धमकी दिल्या जात आहेत. कोणत्या दिशेने महाराष्ट्र निघाला आहे. 6 मार्चला कोल्हापूर बंद करण्याचा कायम निर्णय घेण्यात आला होता. पण बंदमुळे कोल्हापूरच्या जनतेला आम्ही वेठीस धरणार नाही. आज मुख्यमंत्र्यांविरोधात ‘जबाब दो’ आंदोलन करत त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, पोलिसांनी आमच्यावर कितीही दबाव आणू द्या. आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांना आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आर. के. पोवार, ‘आप’चे संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, कॉ. दिलीप पवार, हर्षल सुर्वे, कॉ. सतीशचंद्र कांबळे, सरला पाटील, राणी खंडागळे, चंद्रकांत यादव उपस्थित होते.