श्रद्धेसाठी कायपण! 13 दिवसांत 95 किलोमीटर लोटांगण, सांगलीचा भाविक जोतिबाचरणी लीन

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवी स्वतः अनवाणी चालत दख्खनच्या राजाच्या भेटीला आली. या आख्यायिकेची परंपरा चालविणाऱ्या कोल्हापूरकरांच्या खेटे यात्रेस रविवारपासून (दि. 16) ‘चांगभलं’च्या गजरात सुरुवात झाली असतानाच सोमवारी चक्क लोटांगण घालत सांगलीच्या भक्ताने जोतिबाचरणी आपला माथा टेकविला. तब्बल 13 दिवस 95 कि.मी.चा प्रवास करीत दाखल झालेल्या सुरेश मुळीक (रा. शाळगाव, ता. कडेगाव) या भक्ताने ‘श्रद्धेसाठी कायपण’चा प्रत्यय दिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी सुरेश मुळीक यांनी सोबत 10 ते 12 सहकारी भक्तांना घेऊन टाळ-मृदंगांच्या गजरात आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करीत सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथून वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगराकडे लोटांगण घालत कूच केले.

डांबरी रस्ते, सिमेंटचे रस्ते उन्हाने तापलेले, तर कुठे चिखल झालेले रस्ते अशा खाचखळग्यांनी भरलेल्या खडतर रस्त्यांवर गोणपाटाचे खास बनविलेले कपडे घालून, लोटांगण घालत मुळीक यांनी 13 दिवसांत तब्बल 95 कि.मी. चे खडतर अंतर पार करीत सोमवारी सकाळी श्री जोतिबा मंदिरात प्रवेश केला.

या काळात त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी टाळ-मृदंगांच्या गजरात आणि जोतिबाचा जयघोष करीत एका टेम्पोत जेवणाचे साहित्य घेऊन निघाले होते. दररोज सकाळी लवकर उठून लोटांगण घालत रोज नऊ ते दहा किलोमीटर प्रवास ते करीत. दुपारी काही विश्रांती घेऊन, जेवण करून पुन्हा सायंकाळी लोटांगण घालत रात्री सातपर्यंत पुढचा प्रवास ते करीत होते.