‘चांगभलं’च्या गजराने निनादला जोतिबाचा डोंगर

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशसह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्री यात्रेमुळे लाखो भाविकांच्या मांदियाळीने जोतिबा डोंगर फुलून गेला. आज यात्रेच्या मुख्य दिवशी पारंपरिक वाद्यांच्या तालावर उंचच उंच सासन काठ्या नाचवत, गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण करीत, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या अखंड जयघोषात आबालवृद्ध भाविक रणरणत्या उन्हाची पर्वा न करता तल्लीन झाले होते. उद्या यात्रेचा तिसरा दिवस असून, पहिलाच रविवार पाकाळणीचा असल्याने भाविकांची गर्दी कायम राहणार आहे.

तीन दिवसांच्या यात्रेतील आजचा मुख्य दिवस असून, पहाटे तीन वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी झाले. पहाटे पाच वाजता शासकीय महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाची पारंपरिक राजदरबारी बैठी अलंकार महापूजा बांधण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या सासन काठ्यांचे पूजन होऊन देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार व तोफेच्या सलामीने सासन काठ्यांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.

हस्त नक्षत्रावर सायंकाळी 5.45च्या सुमारास तोफेची सलामी होताच मंदिरातून पारंपरिक लवाजम्यासह श्री जोतिबाच्या पालखीचे प्रस्थान श्री यमाई मंदिराकडे झाले. सूर्यास्तावेळी सायंकाळी 06.45नंतर यमाई मंदिरातील सदरेवर पालखी विराजमान झाली. श्री यमाई (रेणुका) आणि कट्याररूपी जमदग्नी यांचा विवाह संपन्न होऊन रात्री आठच्या सुमारास श्री जोतिबा पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले. रात्री नऊच्या सुमारास पालखी जोतिबा मंदिरातील सदरेवर विराजमान होऊन तोफेच्या सलामीने रात्री 10च्या सुमारास पालखी सोहळा साजरा झाला.