
कोल्हापूर जिह्यातील विशाळगड येथील गजापूर येथे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली झालेली तोडफोडीची घटना सरकारपुरस्पृत होती असा आरोप करतानाच, उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेमागचा मास्टरमाइंड शोधून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. शिवप्रेमींकडून हे कृत्य होणार नाही असे ठामपणे सांगतानाच या घटनेप्रकरणी पोलीस प्रमुखांना तत्काळ निलंबित करण्यात यावे तसेच जिल्हाधिकाऱयांचीही बदली करण्यात यावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.
‘प्रचितगड’ निवासस्थानी विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी विशाळगड प्रकरणावरून त्यांनी मिंधे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडल्याने या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, सरकारने हल्लेखोरांना पाठिशी घालू नये, असे ते म्हणाले. नुकसानग्रस्तांना सरकारने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तोडफोड सुरू असताना पोलिसांचे हात कुणी बांधले होते
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत अशी टीका करताना, विशाळगडावर तोडफोड होत असताना पोलिसांचे हात कुणी बांधले होते याचा सरकारने खुलासा करावा, असे वडेट्टीवार म्हणाले. अतिक्रमणाचा प्रश्न सुसंवादातूनही सोडवता आला असता, पण सरकारला तसे करायचेच नव्हते याकडेही त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली हल्ले करणारे कोण आहेत? घटनेचे धागेदोरे कोणत्या संघटनांशी जोडले आहेत? त्यांचा बोलविता धनी कोण आहे? याचादेखील सरकारने तपास करावा, असे वडेट्टीवार म्हणाले.
या पत्रकार परिषदेला खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. वडेट्टीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले असून चौकशीची मागणी केली आहे.
विधानसभेवर डोळा ठेवूनच महायुतीचे हे कारस्थान
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये पुरोगामी विचारांचे छत्रपती शाहू महाराज विजयी झाले. त्यामुळे जातीयवादी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून अशा दुर्दैवी घटना घडविल्या जात आहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.