भाचीने मर्जी विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने, पै-पाहुण्यां साठी केलेल्या जेवणातच मामाने विष ओतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुदैवाने जेवणाच्या पंगती बसण्यापूर्वीच हा प्रकार समोर आल्याने,मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी मामा महेश ज्योतीराम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात राहणारे महेश पाटील यांच्या भाचीचा आठ दिवसांपूर्वीच प्रेमविवाह गावातीलच एका तरुणांशी झाला. या लग्नाला मुलीच्या मामाचा विरोध होता. विरोध असतानाही भाचीने लग्न केले तसेच लग्न झाल्यानंतर गावातून वरात काढल्यामुळे अब्रू गेल्याच्या रागातून महेश पाटील यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमातील जेवणात चक्क विषारी औषध मिसळण्याचा प्रयत्न केला.यावेळी जेवण करणाऱ्या आचाऱ्याशी त्याची झटापट झाली.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्वागत समारंभाला उपस्थित असलेल्या पै-पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.आचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान विषाची बाटली हातात घेऊन अन्नामध्ये विष कालवून पलायन केलेल्या महेश पाटील याचा शोध पन्हाळा पोलीस घेत आहेत. याप्रकरणी नवरदेवाचे चुलते संजय गोविंद पाटील यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केल्याचे स.पो.नि.संजय बोंबले यांनी सांगितले.