कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा पात्राबाहेर; 46 हून अधिक बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिह्यात पावसाचा जोर ओसरला असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा धुवाँधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, यंदा पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी दुपारी पात्राबाहेर पडले. नदीच्या पातळीत तासाला इंचाइंचाने वाढ होताना दिसून येत होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगेची पातळी 29.6 फूट झाली होती. नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट आहे, तर 46 बंधारे पाण्याखाली गेले असून, अजूनही पावसाची संततधार सुरूच होती.

काही छोटे धरण प्रकल्प पूर्ण भरले असून, त्यातून होणाऱया विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याच्या शक्यतेने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच एनडीआरएफची एक तुकडी कोल्हापुरात दाखल झाली असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.

कोल्हापूर जिह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. ग्रामीण भागात शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरीसह धरण पाणलोट क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणात 41.25 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे धरणाच्या पॉवर हाऊसमधून 1250 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीतही झपाटय़ाने वाढ होत आहे. पंचगंगा, भोगावती, कासारी, हिरण्यकेशी, घटप्रभा, वारणा, ताम्रपर्णी, दूधगंगा या नद्यांवरील 46हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी आलेले बंधारे आणि मार्ग बंद करून तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

राधानगरीत घरावर दरड कोसळली

– राधानगरी तालुक्यातील मोहडे गावातील चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या घराच्या पाठीमागे दरड कोसळून घरावर आली. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. सहाजणांचे हे कुटुंब असून, गावात असलेल्या घरात त्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात येत होते.

वेसरफ, कोदे ल.पा. प्रकल्प भरले

– गगनबावडा तालुक्यातील वेसरफ प्रकल्प पहाटे, तर कोदे ल.पा. हा प्रकल्प दुपारी शंभर टक्के भरल्याने सांडव्यावरून 400 क्युसेक विसर्ग वाहत असून, सरस्वती नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याच्या शक्यतेने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या धरण क्षेत्रात पर्यटकांना येण्यास पाटबंधारे विभागाकडून (उत्तर) बंदी घालण्यात आली आहे.