
कोल्हापूर शहरात आज काहीशी पावसाने उसंत घेतली असली, तरी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगेसह इतरही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडताना दिसत असून, पंचगंगेची वाटचाल आता 39 फुटांच्या इशारा पातळीकडे सुरू आहे. दिवसभरात पातळीत पावणे दोन फुटांची वाढ झाली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पंचगंगेची पाणीपातळी 33.6 फूट झाली होती.
दरम्यान, सायंकाळपर्यंत 57 बंधारे पाण्याखाली गेले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती. तर, जिह्यात पडझडीच्या 12 घटना घडल्या आहेत. यातून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे जिह्यातील दोन राज्यमार्ग आणि चार जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिह्यातील राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात संततधार पाऊस कायम असून, राधानगरी धरण 42 टक्के भरले आहे. धरणातून सध्या 1300, तर वारणा धरणातून 675 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. जलसंधारण विभागाकडील शाहूवाडी तालुक्यातील लघुपाटबंधारे भंडारवाडी, बुरमबाळ, इजोली, बर्की, वाकोली, येळवण जुगाई, आयरेवाडी, गावडी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.