कोल्हापुरात धो-धो पाऊस; 9 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1100 क्युसेकने विसर्ग

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. नद्यांच्या पात्रात पाणीपातळी वाढत असून, सायंकाळी उशिरापर्यंत नऊ बंधारे पाण्याखाली गेले होते. तर, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासांत सव्वातीन फुटांची वाढ होऊन पाणीपातळी 20.4 फूट झाली होती. पंचगंगेची इशारापातळी 39 फुटांवर आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव असे नऊ बंधारे पाण्याखाली गेले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. साडेआठ टीएमसी क्षमतेच्या राधानगरी धरणात सध्या 2.65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मंगळवारी सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार 100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, 1.56 टीएमसी क्षमतेचा घटप्रभा मध्यम प्रकल्प आज दुपारी 100 टक्के भरला. तर, जिल्ह्यात तुळशी 1.35 टीएमसी, वारणा 12.19, दूधगंगा 4.73, कासारी 0.95, कडवी 1.29, कुंभी 0.92, पाटगाव 1.67, चिकोत्रा 0.51, चित्री 0.59, जंगमहट्टी 0.51, घटप्रभा 1.55, जांबरे 0.59, आंबेआहोळ 0.89, सर्फनाला 0.06, व कोदे लघुप्रकल्पामध्ये सध्या 0.10 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

राधानगरी येथे 39.2 मि.मी. पाऊस

कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात 24 तासांत सर्वाधिक 39.2 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर, हातकणंगले 4.6, शिरोळ 2.7, पन्हाळा 34.6, शाहूवाडी 30.1, राधानगरी 39.2, गगनबावडा 38.4, करवीर 9.9, कागल 9.4, गडहिंग्लज 8.6, भुदरगड 16, आजरा 13.3, चंदगड 36.1 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.

चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी

चांदोली धरणक्षेत्रात सोमवारी अतिवृष्टी झाली. चोवीस तासांत 90 मिलिमीटर पाऊस झाला. यंदाची ही पहिलीच अतिवृष्टी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात सध्या 4750 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या सहा ते सात दिवसांपासून चांदोली धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चांदोली धरण आज 35.45 टक्के भरले आहे.

साताऱ्यात ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल

सातारा जिल्ह्यात, विशेषतः पश्चिम भागात कालपासून पावसाचा जोर वाढला असून, या पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल झाले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थिती, दरड कोसळणे, अन्य दुर्घटनांना तत्काळ प्रतिसाद देणे आणि शोध व बचावकार्य सुनियोजित पार पाडण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या पथकाची मदत होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत राहील.

या पथकासोबत एकूण 30 व्यक्ती असून, दोन पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. सद्यःस्थितीत हे पथक कराड येथे तैनात करण्यात आले आहे. या पथकासमवेत आवश्यक यंत्रसामग्री व तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे. जिल्ह्यात कोठेही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी हे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. पथकातील टीम कमांडर सुजित पासवान, तसेच निरीक्षक राजेंद्र कांबळे व पथकातील सदस्यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तसेच कराडचे प्रभारी तहसीलदार चंद्रशेखर शितोळे यांनी केले.