कोल्हापुरात दमदार पाऊस; 7 बंधारे पाण्याखाली, पेरणीला वेग

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसाने आज काहीशी दमदार सुरुवात केली. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पाहता, नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, तर कासारी नदीवरील यवलूज असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच साडेआठ टीएमसी क्षमतेच्या राधानगरी धरणात सध्या 2.54 टीएमसी पाणीसाठा असून, धरणाच्या विद्युतगृहातून 1100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसामुळे शेतीकामालाही वेग आला असून, शिवार फुलून गेले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील सध्याचा पाणीसाठा टीएमसीमध्ये – राधानगरी 2.54, तुळशी 1.33, वारणा 11.85, दूधगंगा 4.53, कासारी 0.92, कडवी 1.28, कुंभी 0.92, पाटगाव 1.61, चिकोत्रा 0.51, चित्री 0.56, जंगमहट्टी 0.49, घटप्रभा 1.43, जांबरे 0.54, आंबेओहोळ 0.89, सर्फनाला 0.03 आणि कोदे लघुप्रकल्प 0.08 टीएमसी.

तसेच पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा 17.10 फूट, सुर्वे 19.5, रुई 45, इचलकरंजी 43.2, तेरवाड 39.9, शिरोळ 31, नृसिंहवाडी 24, राजापूर 13.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 आणि अंकली बंधाऱ्यांची पाणीपातळी 8.1 फूट होती.