अखेर कोल्हापूरला पुराचा वेढा, इशारा पातळी ओलांडलेली पंचगंगा नदी धोका पातळी नजीक

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरूच असुन,शहरासह धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास 39 फुटांची इशारा पातळी गाठलेल्या पंचगंगेची पाणीपातळी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास 40 फुट 11 इंच झाली असून, 43 फुट धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे.

दरम्यान रात्रीपासून पावसाचा जोर कधी संततधार तर कधी रिपरिप असा सुरुच राहिला. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून,आता शहरात प्रवेश करणारे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पन्हाळा रोडवरील केर्ली गावानजीक रस्त्यावर पाणी येऊ लागल्याने, हा रस्ता वाहतुकीसाठी आता बंद होण्याची शक्यता आहे.

तसेच पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून हे फाटा मार्गे कसबा बावडा येथून कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरही पाणी येऊ लागले आहे त्यामुळे हा मार्ग सुद्धा लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.

सध्या सर्वत्र पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. 78 बंधारे पाण्याखाली गेले असुन, 8 राज्यमार्ग, 16 प्रमुख जिल्हा मार्ग, 6 इतर जिल्हा मार्ग आणि 14 ग्रामीण मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. शिवाय मांडुकली येथे पाणी आल्याने कोल्हापूर -गगनबावडा, बाजारभोगाव, अनुस्करा येथे पाणी आल्याने कोल्हापूर -राजापूर तर निळे पुलावर पाणी आल्याने कोल्हापूर – रत्नागिरी या मार्गासह जिल्ह्यात अठरांहून अधिक मार्गावरील एसटी सेवा खंडित झाली आहे.