सोशल मीडियावर एटीएम फोडायचे व्हिडीओ पाहून राजस्थानमधील तरुणांच्या टोळीने कोल्हापुरातील दुर्गम असलेल्या चंदगड तालुक्यातील कोवाडमध्ये फिल्मी स्टाईलने एटीएम मशिन फोडून 18 लाखांची रोकड लंपास केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक जेसीबी चालकाने दिलेल्या माहितीनंतर राजस्थानमधील टोळी समोर आली. यातील चौघांना पोलिसांनी पालघर येथून ताब्यात घेतले असून, तिघांचा शोध सुरू आहे.
तस्लीम इसा खान (वय – 20), अक्रम शाबु खान (वय – 25, दोघे रा. छोटे मशीदजवळ), अलीशेर जमालू खान (वय – 29), तालीम पप्पू खान (वय – 28, दोघे रा. बडे मशीदजवळ, ता. पहाडी, जि. भरतपूर, राजस्थान) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या कोवाडसारख्या ग्रामीण भागात याच टोळीतील सलीम खान नावाचा तरुण छोटी मोठी कामे करत होता. कोवाडमधील एटीएम सेंटरची चोरी करण्याची कल्पना त्याने मित्रांना सांगितली होती. या एटीएमची रेकीही करण्यात आली होती. पालघर येथे राहणाऱ्या अकबर खान याच्याकडे सलीमने सर्व माहिती पोहोचवली होती. तर 29 डिसेंबर रोजी राजस्थानमधून त्याचे काही मित्र कोल्हापुरात आले होते. यात तस्लीम खान सामील होता. त्याने येथे जेसीबी आणि गॅस वेल्डिंग व्यावसायिकांकडे चौकशी केली होती. या तिघांनी याबाबतचे नियोजन केल्यानंतर राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात राहणाऱ्या आणखी तिघांना बोलावले. वेळ कमी असल्याने हे तिघे दिल्लीमार्गे मुंबईत विमानाने आले.
नियोजन केल्यानुसार 5 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास आलिशान गाडीतून आलेल्या या टोळीने कोवाडमधील एटीएम केंद्रावर कोणीही नसल्याचे पाहून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रेचा फवारा करत एटीएम फोडून यातील 18 लाख 77 हजार 300 रुपयांची रक्कम लुटून राजस्थानकडे पलायन केले.
तिघांचा शोध सुरू
दरम्यान, यातील चोरट्याने कोल्हापुरात जेसीबी आणि गॅस वेल्डिंग व्यावसायिकांकडे चौकशी केली होती. पोलिसांच्या तपासात यातील एका जेसीबी व्यावसायिकाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून चौघांना ताब्यात घेतले, तर हरियाणातील इस्माईलकडे रक्कम पोहोचवून बाकीचे तिघे पसार झाले आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.