कोल्हापुरात वर्षभरात 62 खून, बलात्काराचे 179 गुन्हे; दोषसिद्धी 12 टक्के, गुन्ह्यांच्या संख्येत वाढ, तर दरोडा, खुनाचा प्रयत्न गुन्ह्यांत घट

यंदाच्या वर्षी दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अशा महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या बंदोबस्ताचा ताण सहन करत जिल्हा पोलिसांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भाग-5चे एकूण गुन्हे पाच हजार 490 असून, गतवर्षीच्या तुलनेत 2 हजार 407ने गुन्ह्यांची संख्या कमी आहे. भाग-6चे एकूण गुन्हे आठ हजार 216 असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दोन हजार 890ने अधिक आहे. वर्षभरात 62 खून, बलात्कार 179, विनयभंगाचे 313 गुन्हे दाखल झाले, तर दोषसिद्धी 12 टक्के, तर दरोडा, खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांत घट झाल्याचे दिसून आले.

या वर्षी भाग-1 ते 5मध्ये झालेली गुन्ह्यांची घट ही प्रामुख्याने ठकबाजी 1150, खुनाचा प्रयत्न 13, चोरी 497, घरफोडी 58, जबरी चोरी 49, गर्दी मारामारी 158, विनयभंग 101, दुखापत 205, अपघातात मृत्यू (फेटल) 26, घराविषयी आगळीक 50 या गुन्ह्यांत झाली आहे. तर, भाग-6मध्ये गुन्ह्यांची झालेली वाढ ही प्रामुख्याने दारूबंदी 1968, जुगार 96, अमली पदार्थ, गुटखा, मोटर वाहन, दारू पिऊन वाहन चालविणे या गुन्ह्यांत वाढ झालेली आहे. चालू वर्षी भाग-6 मध्ये एकूण झालेली वाढ ही प्रामुख्याने ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह 1204, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांविरुद्ध 452, हयगयीने वाहन चालविणारे 753, ‘कोप्ता’चे 55 आणि भादंवि कलम 188 नुसार 45 केसेस यामुळे झालेली आहे. या वर्षी ‘निर्भया पथकां ‘कडून नऊ हजार 738 कारवाई झाली. गेल्या वर्षी पाच हजार 747 कारवाई झाली होती.

वर्षभरात खुनाचे 62 गुन्हे दाखल असून, मागील वर्षी 48 गुन्हे दाखल होते. गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षी 14 गुन्ह्यांची वाढ झाली आहे. यात प्रेमप्रकरण, चारित्र्य संशय 11, आर्थिक देवाण-घेवाण 9, पूर्वीच्या भांडणे 10, घरगुती वादातून 8, तत्कालीन कारण 12, टोळीतील शत्रुत्व 2 आणि इतर कारणावरून 10 खून अशी संख्या आहे. शिवाय खुनाचा प्रयत्नांत या वर्षी 68 गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 13 गुन्ह्यांनी घट झाली आहे. यातही प्रेमप्रकरण, चारित्र्य संशय 5, आर्थिक देवाण-घेवाण 10, पूर्वीचे भांडण 13, घरगुती वादातून 7, तत्कालीन कारण 16, टोळीतील शत्रुत्व 2 इतर कारणावरून 10, तर जमिनीच्या वादातून 5 गुन्ह्यांचा समावेश आहे.

या वर्षी दरोड्याचे 8 गुन्हे दाखल असून, मागील वर्षी 11 गुन्हे दाखल होते. यात एका व्यावसायिक गुन्हेगारांनी व्हिजिलन्स ऑफिसर भासवून जबरदस्तीने एकास लुटले होते. या गुन्ह्यात तिघांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यांतील 25 लाख रुपये व वापरलेली वाहने असा एकूण 55 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याशिवाय ‘मोक्का अंतर्गत कुरुंदवाड पोलीस ठाण्याअंतर्गत सागऱ्या पवारची गैंग 10 आरोपी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत जर्मन गैंग 7 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तर, विविध गुन्ह्यांतील 76 जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी 7864 अर्ज चौकशीला आले होते, त्या सर्व अर्जावर कारवाई झाली आहे. तर, चालू वर्षी 8044 अर्ज चौकशीस आले होते. त्यांपैकी 7269 अर्जावर कारवाई करण्यात आली असून, उर्वरित 775 अर्ज चौकशीवर प्रलंबित आहेत.

या वर्षी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासासाठी प्राप्त 37पैकी 25 गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच समांतर तपासातून 50 मुलींचा शोध घेऊन ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. चालू वर्षी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करून त्यामध्ये 22 आरोपींना अटक करून 13 पीडित महिलांची मुक्तता केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून वेश्याव्यवसायात लोकांना आकर्षित करणाऱ्या वारांगणांवर 10 गुन्हे दाखल करून 20 महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.

विविध गुन्ह्यांची संख्या (कंसात गेल्या वर्षीचे आकडे

जबरी चोरी 63 (कमी 49), घरफोडी, चोरी 339 (कमी 58), चोरी सर्व 1,357 (कमी 497), बलात्कार 179 (कमी 4), गर्दी मारामारी 274 (कमी 158), ठकबाजी 201 (कमी 1150), दुखापत 871 (कमी 205), विनयभंग 313 (कमी 101), मनुष्य पळवून नेणे 249 (कमी 8), सरकारी नोकरावर हल्ला 47 (कमी 1), प्राणघातक अपघात 363 (कमी 26), ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह 1204 (वाढ 787), जीवनावश्यक वस्तू 40 (वाढ 27).

अवैध व्यवसायावरील कारवाई

चालू वर्षी जुगार कायद्याखाली 1402 केसेस करून, त्यामध्ये 1 कोटी 51 लाख 47 हजार 474 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदी कायद्याखाली 3 हजार 467 इतक्या केसेस करून, त्यामध्ये 5 कोटी 08 लाख 30 हजार 504 रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे. तर अमली पदार्थ कायद्याखाली 112 केसेस करून त्यामध्ये 86 लाख 62 हजार 646 रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे. गुटखा कायद्याखाली 76 केसेस करून, त्यामध्ये 1 कोटी 68 लाख 26 हजार 749 रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे.

मोटर वाहन कारवाई; 10 कोटी वसूल

चालू वर्षी सन 2024 मध्ये मोटर वाहन कायद्याखाली विनाहेल्मेट, सीटबेल्ट, लायसन्स जवळ न बाळगणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, दारू पिऊन वाहन चालविणे, कर्कश हॉर्न, ट्रिपलसीट, वाहतुकीस अडथळा, फॅन्सी नंबरप्लेटबाबत 1 लाख 52 हजार 607 केसेसमधून 10 कोटी 10 लाख 39 हजार 50 रुपये शुल्क वसूल करण्यात आले.

दोषसिद्धी

चालू वर्षी जिल्हा व सत्र न्यायालयाकडील 318 गुन्ह्यांच्या निकालात 37 गुन्हे शाबित झाले असून, 289 गुन्हे सुटलेले आहेत. गुन्हे शाबितीचे प्रमाण 12 टक्के आहे. तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडील 5 हजार 476 गुन्ह्यांचे निकाल होऊन त्यापैकी 1 हजार 439 गुन्हे शाबित झाले असून, गुन्हे शाबितीचे प्रमाण 26 टक्के आहे.

सायबर पोलिसांची कामगिरी

आर्थिक फसवणुकीसह सोशल मीडियासंदर्भात व इतर अशा मिळून 5102 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ऑनलाइन फ्रॉडच्या 4276 प्रकरणांत पाच कोटी 33 लाख 51 हजार 396 रुपयांची रक्कम तत्काळ गोठविणे, परत मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. याशिवाय खुनाचे 48 गुन्हे, बलात्कार व पोक्सोचे 223, अपहरण 249, दरोड्याचे 11, जबरी चोरीचे 88, घरफोडी चोरी व सर्व चोऱ्यांचे 586 गुन्हे उघडकीस आणण्यात चांगली कामगिरी केली आहे.