विषाणू हातपाय पसरतोय… आरोग्यमंत्र्यांच्या जिल्हय़ात जीबीएसचा पहिला बळी

पुणे शहरात थैमान घालणाऱ्या गुलियन बॅरी सिंड्रोममुळे (जीबीएस) राज्यभरात आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली असतानाच, आता आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याच जिह्यात चंदगड तालुक्यातील बाधित 60 वर्षीय वृद्ध महिलेचा सीपीआरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हय़ात अजूनही 8 जणांवर उपचार सुरू आहेत.

सोनारवाडी (ता. चंदगड) येथील वृद्धेला गेल्या चार दिवसांपासून या आजारामुळे छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना, आज सकाळी या वृद्धेचा मृत्यू झाला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 60 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात सरासरी जितके रुग्ण या आजाराचे दाखल होतात, तितकेच यंदाच्या वर्षातही दाखल झाले आहेत. नागरिकांनी गोंधळून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी केले आहे.