मध्यरात्रीस खेळ चाले, खेळाडूंचा दम काढणाऱ्या स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई उपनगर पश्चिम विजेते

कबड्डीची श्रीमंती दाखवणारी भव्यदिव्य क्रीडांगणे आणि प्रेक्षक गॅलरी, दृष्ट लागण्याजोगी दिमाखदार व्यवस्था आयोजकांनी उभारून दिल्यानंतरही राज्य कबड्डी संघटकांच्या नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे मातीतल्या दमदार कबड्डीची अक्षरशः माती केली. कबड्डी संघटकांचे ढिसाळ नियोजन आणि पंचांच्या सदोष पंचगिरीमुळे खेळाडूंचा दम काढणारी 72 वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा चक्क मध्यरात्री अडीचच्या ठोक्याला संपली. आयोजकांच्या नाकात दम आणलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरने अहिल्यानगरचा 42-32 असा तर मुंबई उपनगर पश्चिम संघाने मुंबई शहर पश्चिमचा पाच-पाच चढायांच्या डावात 5-6 (33-32) असा पराभव करत महिला गटात बाजी मारली.

कबड्डीचे ग्लॅमर वाढवण्यासाठी, खेळाडूंच्या जोरदार खेळासाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा आयोजक संजय वाघुले आणि कृष्णा पाटील यांनी उभारली होती. सारं काही भव्यदिव्य आणि नेत्रदीपक असताना राज्य कबड्डी संघटकांमध्ये असलेले वाद आणि पंचांच्या सदोष पंचगिरीने स्पर्धेचे बारा नव्हे तर अक्षरशः अडीच वाजवले. पंचांच्या सदोष आणि घाबरगुंडी उडालेल्या पंचगिरीमुळे पेटलेले वातावरण क्षणार्धात शांत करण्याची धमक राज्य कबड्डी संघटकांत होती, पण स्पर्धेला आलेल्या दिग्गज संघटकांनी दुरून मजा पाहण्यातच धन्यता मानली आणि एका दिमाखदार आणि सुंदर स्पर्धेचा शेवट दुर्दैवी झाला.

राज्यातून सर्वच जिह्यांचे मोठ्या संख्येने पदाधिकारी ठाण्यात पोहोचले होते, पण सारेच पाहुण्यांसारखे वावरले. कुणालाही या कबड्डीचे काही पडले नव्हते. एकमेकांचे पाय खेचण्यातच साऱ्यांची डोकी धावत असल्याचे चित्र जागोजागी दिसत होते. सदोष पंचगिरी आणि कबड्डी संघटकांचा ढिसाळ कारभार यामुळे वेळेची किंमत कुणालाही दिसली नाही. कुणीही उठून पंचांशी वाद घालत होता. मैदानात सामना खेळायला खेळाडू पोहोचले होते, पण पंचांचा पत्ता नव्हता. त्यातच मुंबई शहर आणि नाशिक संघांच्या विरोधामुळे तापलेल्या वातावरणाने कबड्डीतला बेशिस्तपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला.

ठरलेल्या वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होणे अपेक्षित असलेला पुरुष गटाचा अंतिम सामना मध्यरात्री एकच्या ठोक्याला सुरू झाला आणि तो चक्क सवा दोन वाजता संपला. वेळेची किंमत नसलेल्या संघटकांमुळे आणखी एका स्पर्धेत खेळ आणि खेळाडूंचा घोर अपमान केला गेला. स्पर्धा कोणतीही असो, ती रात्री 10 वाजण्याच्या आत संपायला हवी. पण वेळेच्या बाबतीत बेफिकीर असलेल्या कबड्डी संघटकांना पुन्हा एकदा आपलीच लाज काढली.

केवळ एक सामना खेळून ताजातवाना असलेल्या कोल्हापूरने पुरुषांच्या अंतिम सामन्यात अहिल्यानगरचा 42-32 असा पराभव करीत दोन तपाच्या कालावधीनंतर श्रीकृष्ण करंडक फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. उपविजेत्या अहिल्यानगरने सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. कोल्हापूरने सुरुवातीपासून सामन्यात 18-13 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही कोल्हापूरच्या चढाईबहाद्दरांनी खेळ करत 42-32 असा गुणांसह जेतेपद संपादले.

महिलांच्या अंतिम सामना मात्र हृदयाचे ठोके चुकवणारा होता. मुंबई उपनगर आणि मुंबई शहरच्या पश्चिम संघांमधला हा संघर्ष 27-27 असा बरोबरीत सुटला. सोनाली शिंगटेची अंतिम क्षणी केलेली पकड मुंबई उपनगरच्या पथ्यावर पडली. या पकडीनंतर मुंबई शहरवर सामन्यातील एकमेव लोण पडला आणि मुंबई उपनगरच्या मुलींनी बरोबरी साधली. त्यानंतर पाच-पाच चढायांच्या डावात उपनगरने 6-5 अशी बाजी खेचून आणली.

याअगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगर पश्चिमने मुंबई शहर पूर्वचा 28-25 असा, तर मुंबई शहर पश्चिमने पुणे शहरचा 37-35 असा पाडाव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. पुरुषांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने पुणे ग्रामीणचा 32-29 असा, तर अहिल्यानगरने मुंबई शहर पूर्वचा 36-27 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.

सलग खेळलेल्या तीन सामन्यांनी मुंबई शहर पूर्वला नमवले

शेवटचा दिवस गाजवला तो मुंबई शहर पूर्वच्या पुरुष संघाने. उपउपांत्यपूर्व फेरीच्या वादग्रस्त सामन्याने राज्य संघटनेचा अक्षरशः जीव काढला. पंचांचे चुकीचे निर्णय राज्य संघटनेला महागात पडले. मुंबई शहरने सामना सोडण्याची दिलेली धमकी आणि त्यानंतर रंगलेल्या नाट्याने कबड्डी संघटक आणि आयोजकांना अक्षरशः दमवले. अखेर अनेक तासांच्या मनधरणीनंतर सामना सुरू झाला खरा, पण या सामन्याने कबड्डीचे वेळेचे काटेच फिरवले.

मुंबई शहर पूर्वने आधी सामना पुन्हा खेळविण्यास भाग पाडणाऱ्या नाशिकचा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मग पुणे शहरला धक्का देत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. कबड्डीच्या नियमानुसार एका सत्रात दोन सामने खेळता येतात, पण मुंबई शहर पूर्वला तीन तासांत तिसरा सामना खेळावा लागला. सलग दोन सामने खेळल्याने दमलेल्या मुंबई शहर पूर्वला उपांत्य फेरीत अहिल्यानगरवर मात करता आली नाही, अन्यथा मुंबई शहर अंतिम सामन्यातही कोल्हापूरशी भिडला असता.