
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) स्वीकारली आहे.
कोण आहे दहशतवादी संघटना टीआरएफ?
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या टीआरएफने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन-तीन दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले आणि त्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या टीआरएफने याआधी अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. टीआरएफचे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत. टीआरएफची निर्मिती लष्कर-ए-तैयबाने केली होती, असं बोललं जातं. टीआरएफ गैर-काश्मीरींना लक्ष्य करते. टीआरएफ निष्पाप नागरिकांची हत्या, शस्त्रास्त्रांची तस्करी, दहशतवाद्यांची भरती इत्यादी कारवायांमध्ये सहभागी आहे.