कोण आहे गौतम अदानी यांचा भाचा सागर, लाचखोरी प्रकरणात आलं नाव; जाणून घ्या

उद्योगपती अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टामध्ये अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा खटला दाखल केला आहे. अदानी यांनी हिंदुस्थानात सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची लाच देऊ केली होती तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असे युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाने म्हटले आहे. लाचखोरीचा आरोप असलेल्या आठ जणांमध्ये गौतम अदानी यांचा भाचा सागर अदानी याचेही नाव आहे.

कोण आहे सागर अदानी?

सागर अदानी हा गौतम अदानी यांचा भाऊ राजेश अदानी यांचा मुलगा आहे. राजेश अदानी हे देखील अदानी समूहाच्या सुरुवातीपासूनच एक भाग आहेत. सागर अदानी हे अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक आहेत. अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर ते कंपनीत रुजू झाले. अदानी ग्रीन एनर्जीच्या सौर आणि पवन ऊर्जा पोर्टफोलिओच्या विस्ताराचे श्रेय सागर अदानी यांना जाते.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्या चार नावांची चर्चा होत आहे, त्यात सागर अदानी याचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय गौतम अदानी यांची मुले करण , जीत आणि चुलत भाऊ प्रणव अदानी यांची नावे ब्लूमबर्गच्या या यादीत समाविष्ट आहेत.