अॅण्टॉप हिल येथील सनातन धर्म हायस्कूलमध्ये सोमवारी भयंकर घटना घडली. वर्गामध्ये बसण्याच्या जागेवरून झालेला वाद टिपेला गेला आणि त्यातून दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने अन्य दोघा विद्यार्थ्यांवर शाळेतच चाकूहल्ला केला. या चाकूहल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
सनातन धर्म हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रिलीम परीक्षा सुरू आहेत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी प्रार्थनेसाठी तळमजल्यावर होते, तर ते चोघे विद्यार्थी चौथ्या मजल्यावरील वर्गात जागेवरून हुज्जत घालत होते. त्यापैकी एका विद्यार्थ्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या सहकाऱयाकडील चाकूने अन्य दोघा विद्यार्थ्यांवर वार केले. हा प्रकार कळताच शाळेमध्ये एकच खळबळ उडाली. चाकूचा वार झाल्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ इस्पितळात नेण्यात आले.
या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांविरोधात हत्येचा प्रयत्न, घातक हत्यार बाळगणे आणि इतरांना जखमी करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे समजते.