आगामी पर्थ कसोटीत हिंदुस्थानी संघात आघाडीचा फलंदाज म्हणून वर्णी लागावी म्हणून केएल राहुलची हिंदुस्थान अ संघात केलेली निवडही वाया गेली. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या अनौपचारिक कसोटीच्या दुसऱ्या डावातही राहुल आपल्या फलंदाजीची छाप पाडू न शकल्यामुळे अ संघ तिसऱ्या दिवसअखेर 5 बाद 73 अशा बिकट अवस्थेत असून अ संघाकडे दुसऱ्या डावात केवळ 11 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल (19) आणि नितीश कुमार रेड्डी (9) हे दोघे खेळत होते.
हिंदुस्थानच्या अ संघातून मुख्य क्रिकेट संघाला आघाडीचा चांगला फलंदाज मिळेल अशी अपेक्षा होती. साऱ्यांच्या नजरा राहुल आणि अभिमन्यूकडे लागल्या होत्या, पण दोघांनीही घोर निराशा केली. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या अभिमन्यू ईश्वरनला 17 धावांवर बाद केले, तर कॉरी रॉकीचोलीने राहुलचा त्रिफळा दोन पायांच्या मधून उडवत त्याच्या पर्थ कसोटी संघात संधी मिळण्याच्या आशाही उधळून लावल्या. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला नेमकी कुणाच्या हातात बॅट दिसेल, याबाबत अद्याप साशंकता आहे.
प्रसिद्ध कृष्णाने ऑस्ट्रेलिया अ ला गुंडाळले
काल 53 धावांत 2 विकेट गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियन अ संघाला प्रसिद्ध कृष्णाने चांगलाच तडाखा दिला. त्यामुळे यजमानांचा संघ 223 धावांपर्यंतच मजल मारू शकला. आज सकाळी खलील अहमद, प्रसिद्ध आणि मुकेश कुमारने तासाभरातच 3 हादरे देत ऑस्ट्रेलियन अ संघाची 5 बाद 84 धावा अशी अवस्था केली होती. मार्कस हॅरिसने 74 धावांची खेळी करत संघाला सावरले. त्याने जिमी पिअरसनच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या. ही जोडी प्रसिद्धनेच पह्डली आणि त्यानंतर सलग चेंडूंवर हॅरिस व बोलॅण्डला यष्टिरक्षक जुरेलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. या तीन हादऱ्यांमुळे ऑस्ट्रेलियन अ संघ 8 बाद 167 अशा स्थितीत होता, पण नवव्या विकेटसाठी 56 धावांची भागी रचत संघाचा डाव 223 धावांपर्यंत लांबवला. नॅथन मॅकअॅण्ड्र्य़ू (ना. 26) आणि कोरी रॉकीचोली (35) यांच्या झुंजार भागीमुळे यजमानांना 62 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवता आली. कृष्णाने 50 धावांत 4, तर मुकेश कुमारने 3 व खलील अहमदने 2 विकेट टिपल्या.
जुरेल पर्थचे दार ठोठावतोय
ध्रुव जुरेलवर कुणाची नजरही नाही, पण या यष्टिरक्षक फलंदाजाने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. पहिल्या डावातही त्याने 80 धावा केल्या होत्या, तर दुसऱया डावातही तो 19 धावांवर खेळतोय. पहिल्या डावातील झुंजार खेळाने त्याचा पर्थ कसोटी संघासाठी विचार होऊ लागला आहे. जर दुसऱया डावातही त्याच्या बॅटीतून धावा निघाल्या, तर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीत तो फलंदाजीला उतरला तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. दुसऱ्या डावात अ संघाची 5 बाद 73 अशी भीषण अवस्था असल्यामुळे हिंदुस्थानला पराभव टाळण्यासाठी झुंजार खेळ करावा लागणार आहे.