किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है! राहत इंदौरींच्या शायरीतून दिलजीतचं हुल्लडबाजांना उत्तर

दिलजीत दोसांझ हा पंजाबी गायक सध्या ‘दिल-लुनिनाती’ कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. देशभरात त्याचे कॉन्सर्ट होत असून त्याला भरघोस प्रतिसादही मिळतोय. बंगळुरूमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण ही धमाल करताना दिसली होती. त्यानंतर इंदूरमध्ये त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. मात्र या कॉन्सर्टच्या एक दिवस आधी या कार्यक्रमात खुलेआमपणे दारू आणि मांस वाटप केले जाणार असल्याची वावडी उठल्याने बजरंग दलने याला विरोध केला. याला आता दिलजीत दोसांझने राहत इंदौरी यांच्या शायरीतून उत्तर दिले आहे.

दिलजीत दोसांझ याने बजरंग दलाचा थेट नामोल्लेख टाळला. मात्र रविवारी इंदूरमध्ये आयोजित आपल्या कॉन्सर्टमध्ये दिवंगत गीतकार राहत इंदौरी यांच्या सुप्रसिद्ध ‘अगर खिलाफ है होने दो’ या रचनेचा एक भाग वाचून दाखवला. “अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी है, ये सब धुआं है कोई आसमां थोड़ी है, सब का खून है शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है।” अशा शब्दात दिलजीतने उत्तर दिले.

दारू आणि मांसाचा वाटप नाही

दिलजीत दोसांझ याच्या इंदूरमधील कॉन्सर्टमध्ये दारू आणि मांसाचे वाटप करण्यात आले नाही. कॉन्सर्टमध्ये जाणाऱ्या एका व्यक्तीने याची पुष्टी केली असून या कार्यक्रमात पोलिसांनी आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आल्याचेही सांगितले. दरम्यान, विरोधानंतरही दिलजीतच्या कॉन्सर्टला चांगला प्रतिसाद मिळत असून 14 डिसेंबरला चंदीगड येथे कार्यक्रम होणार आहे, तर 29 डिसेंबरला गुवाहाटी येथे ग्रँड फिनाले होणार आहे.

महाकालचे दर्शन घेतले

दरम्यान, दिलजीत सिंह याने मंगळवारी उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेतले. दिलजीत भस्म आरतीमध्ये सहभागी झाला. यादरम्यान जवळपास दोन तास तो नंदीजवळ हात जोडून बसला होता.

पुण्यातही विरोध

दिलजीत दोसांझ याचा ‘दिल-लुनिनाती’ कॉन्सर्टवरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी पुण्यातही असाच प्रकार घडला होता. कोथरूडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात दारू देण्याची परवानगी पुण्यातील राज्य दारूबंदी विभागाने रद्द केली होती. स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेत्यांच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

गाण्यावर सेन्सॉरशिप, चित्रपटावर का नाही?

दिलजीतच्या गाण्यांमध्ये दारूचा उल्लेख असल्याने ते सेन्सॉर करण्यात आले. यावरही त्याने परखड भाष्य केले. मी माझी गाणी किंवा स्वत:ची बाजू मांडत नाही. माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की गाण्यावर सेन्सॉरशिप लावता, मग चित्रपटांवर का नाही. हिंदुस्थानातील एकही बडा अभिनेता नसेल ज्याने दारूवर एकही गाणे चित्रित केले नसेल. दिसतोय तुम्हाला कुणी? सेन्सॉरशिप लावायचीच असेल तर या सर्वांवरही लावायला हवी, अशी मागणी दिलजीतने केली.