लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीमुळे भाजपच्या मंत्र्याचा राजीनामा, पक्षाला दिलेला शब्द पाळला

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. यानंतर भाजपचे नेते किरोडी लाल मीना यांनी राजस्थान मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. किरोडी लाल मीणा यांनी त्यांच्या जबाबदारीखालील लोकसभेच्या सातपैकी कोणतीही जागा गमावल्यास पक्षाचा राजीनामा देण्याचं आश्वासन पक्षाला दिलं होतं. त्याप्रमाणे लोकसभेच्या निकालानंतर मीना मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांच्या सहाय्यकाने गुरुवारी दिली.

Rajasthan Minister Kirodi Lal Meena

यंदाच्या लोकसभेत भाजपची कामागिरी चांगलीच खालावल्याचं पाहायला मिळालं आहे. राजस्थाममध्ये देखील भाजपला काही जागांवर फटका बसला. किरोडी लाल मीना यांच्या मूळ दौसासह अन्य काही जागा भाजपने गमावल्या. त्यानंतर किरोडी लाल मीना राजीनामा देणार का? याकडे साऱ्यांचं लक्षं लागलं होतं. कारण लोकसभेत त्यांच्या जबाबदारीतील एक जरी जागा भाजप हरली तरी आपण राजीनामा देऊ असा शब्द त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिला होता. अखेर त्यांनी शब्द पाळला.

‘किरोडी मीना यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 10 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला होता’, असं त्यांच्या सहाय्यकाने स्पष्ट केलं आहे.