‘मला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीपूर्वी किरेन रिजिजू यांचं वक्तव्य

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात देशभरातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली जात आहेत. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरासह अनेक राज्यांमध्ये या कायद्याविरुद्ध हिंसाचार उसळला आहे. या विरोधात अनेक विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, याचबद्दल संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय कायदेविषयक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असा त्यांना विश्वास आहे.

एनडीटीव्हीशी संवाद साधताना किरेन रिजिजू म्हणाले, “सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. उद्या सरकारने न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केला तर ते चांगले होणार नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. अधिकारांचे विभाजन कास करण्यात आलं आहे, हे चांगल्या प्रकारे परिभाषित आहे.” दरम्यान, सर्वोच्च न्यायालय बुधवारी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.