अजमेर दर्ग्यावर मोदींकडून चादर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेली चादर पेंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी जगभरात अजमेर शरीफ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर अर्पण केली. यावेळी त्यांनी देशात शांतता आणि बंधुभावासाठी प्रार्थना केली. त्यानंतर मोदी यांचा संदेश वाचून दाखवला.

अजमेर येथील दर्ग्यावर उरुसादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते चादर अर्पण करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर अर्पण करण्याची प्रथा सुरू ठेवली आहे. मात्र या वर्षी अजमेर शरीफला चादर पाठवू नये अशी मागणी हिंदू संघटनांनी पत्राद्वारे मोदींकडे केली होती, परंतु असे असले तरीही मोदींनी चादर पाठवण्याचा निर्णय घेतला. यंदा अकराव्या वेळी मंत्री किरेन रिजिजू यांनी मोदींनी पाठवलेली चादर दर्ग्यावर अर्पण केली.

मंत्री किरेन रिजिजू यांनी ‘एक्स’वरून याबाबत माहिती दिली. दर्ग्यावर चादर अर्पण करून आशीर्वाद मिळवला. हे आध्यात्मिक स्थान आपल्या सर्वांना विश्वास आणि करुणेची शाश्वत शक्ती देते. त्यांचे आशीर्वाद आपल्याला सेवा, सौहार्दपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन करतील, असे म्हटले आहे. दरम्यान मोदींच्या वतीने चादर अर्पण करणे म्हणजे देशाच्या वतीने चादर अर्पण करण्यासारखे असल्याचे रिजिजू यांनी जयपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना सांगितले.

वेब पोर्टल आणि अॅप लाँच

अल्पसंख्यांक कार्य मंत्री रिजिजू यांच्या हस्ते दर्गाह शरीफचे वेब पोर्टल आणि गरीब नवाज हे अॅप लाँच करण्यात आले. देशात सर्वत्र शांतता नांदावी असे सांगताना अजमेर येथील दर्ग्याला लाखो लोक भेट देत असतात. अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून अॅप आणि वेब पोर्टल सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून दर्ग्यात उपलब्ध सुविधांसह सर्व प्रकारची माहिती मिळवता येईल, असे रिजिजू यांनी नमूद केले.

हिंदू सेनेने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात काय?

हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, चादर पाठवण्यास आपला आक्षेप नाही, मात्र घटनात्मक पदावरील व्यक्तीने चादर पाठवली तर त्याचा थेट परिणाम कोर्टात सुरू असलेल्या खटल्यावर होईल. त्यामुळेच विष्णू गुप्ता यांनी पत्र पाठवून परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत चादर न पाठवण्याची विनंती केली आहे. जोपर्यंत अयोध्या प्रकरण कोर्टात सुरू होते तोपर्यंत पीएम मोदी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले नव्हते. आताही प्रकरण कोर्टात असेपर्यंत चादर पाठवू नये.

उरुसाच्या निमित्ताने पंतप्रधानांचा संदेश

‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरुसानिमित्त विनम्र अभिवादन. हा उरुस सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो.’, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक्स’वरून या उरुसाच्या निमित्ताने दिल्या आहेत.