
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने 8 आरोपींना अटक केली आहे. हे लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरात या देशातील पाच राज्यांमध्ये असलेल्या रुग्णालयांमध्ये अवैध किडनी प्रत्यारोपण रॅकेट चालवत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा म्होरक्या संदीप आर्य आणि त्याचा मेहुणा देवेंद्र झा यांचा समावेश आहे. संदीप आर्य हे प्रत्यारोपण समन्वयक आहेत. संदीपने 5 राज्यांतील जवळपास 11 खासगी हॉस्पिटलमध्ये 34 किडनी प्रत्यारोपण केले आहे. यापूर्वी 9 जुलै रोजी दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय किडनी ट्रान्सप्लांट टोळीचा पर्दाफाश केला होता. यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. या कारवाई नंतर दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. विजया कुमारी यांच्यासह 7 जणांना अटक करण्यात आली होती.
बनावट कागदपत्रे
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 34 बनावट तिकिटे, 17 मोबाईल, 2 लॅपटॉप, 9 सिम, 1 मर्सिडीझ कार, 1.5 लाख रुपयांची बनावट कागदपत्रे आणि रुग्ण किंवा किडनी घेणाऱयांच्या फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
25 ते 30 लाखांना किडनीची विक्री
विजया कुमारी यांनी नोएडातील एका प्रसिद्ध रुग्णालयात बेकायदेशीररीत्या 15 हून अधिक किडनी प्रत्यारोपण केल्या होत्या. या टोळीशी संबंधित लोक 4 ते 5 लाख रुपयांना किडनी खरेदी करायचे आणि 25 ते 30 लाख रुपयांना विकायचे. त्यामुळे किडनी रॅकेटमध्ये आतापर्यंत एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे.