बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे सुमारे 40 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या दहा खंडणीखोरांवर अंबरनाथ पोलिसांनी झडप घातली आहे. या खंडणीखोरांवर झडप घालण्यासाठी पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 105 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने बारा तासांत खंडणीखोरांच्या मुसक्या आवळून अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली. यापैकी दोन आरोपींनी मुंबई महापालिकेत फायरमनची नोकरी लावतो, अशी बतावणी करून अनेक तरुणांची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केली होती. ते पैसे परत देण्यासाठी त्यांनी बिल्डरच्या मुलाचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाचा वीस वर्षीय मुलगा आपल्या स्विफ्ट कारमधून चालला असताना अपहरणकर्त्यांनी अंबरनाथ पूर्व भागातील ग्लोबल सिटी परिसरात त्याची कार अडवली आणि त्याला आपल्या इर्टिका कारमध्ये बसून अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी या बांधकाम व्यावसायिकाला 40 कोटींच्या खंडणीसाठी धमकावले. तडजोड करून खंडणीखोरांनी ही रक्कम प्रथम सात कोटी आणि नंतर दोन कोटींवर आणली. संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तयार केली. सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी देविदास वाघमारे, दत्तात्रय पवार यांच्यासह दहा खंडणीखोरांवर झडप घालून मुलाची सुटका केली.