खंडणी न दिल्याने घाटनांद्र्याच्या तरुणाचे अपहरण करून खून; पोलिसांनी केले आरोपीस जेरबंद

खंडणीची रक्कम न दिल्याने 35 वर्षीय तरुणाचे अपहरण करून निघृणपणे खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना घाटनांद्रा येथे उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीस जेरबंद केले आहे.

येथील सेवानिवृत्त सैनिक नामदेव भुरकाजी मोरे यांचा मुलगा कैलास नामदेव मोरे (35) हा शनिवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाला. नामदेव मोरे व त्यांच्या नातेवाईकांनी कैलासचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. अखेर नामदेव मोरे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांत कैलास बेपत्ता असल्याची माहिती दिल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कोल्हे व पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू केला.

अखेर मयत कैलास या तरुणाचे येथील संजय मोरे याने अपहरण करून खंडणी न दिल्याने त्याने कैलासचा खून करून मृतदेह शेतात पुरुन टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरील आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे.

अचानक बेपत्ता झालेल्या कैलास मोरे याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. मयत कैलासच्या मोबाईलवरून आलेल्या शेवटच्या कॉलच्या आधारे तपास करण्यात आला त्यावेळी घाटनांद्रा येथीला संजय राजेंद्र मोरे याचे नाव समोर आले. संजयविषयी गोपनिय माहिती घेतली असता त्याला शेअर मार्केट ट्रेडिंगचा छंद असल्याने तो कर्जात बुडाला होता. त्यामुळे त्याने लोकांकडून कर्ज घेतले होते. शनिवार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी संशयीत संजय राजेंद्र मोरे याने बेपत्ता कैलास मोरे यास शेतामध्ये नेवून पैशाची मागणी केली. परंतु कैलास याने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांचा वाद झाला व संजयने कैलासचा गळा आवळून त्याचा खून केला. खून केल्यानंतर कैलासचा मृतदेह मकाच्या शेतात लपवून ठेवला व रात्री पुन्हा शेतात जाऊन बांधावर खड्डा खोदून मृतदेह त्या खड्यात पुरून टाकला. त्यांनतर कैलासच्या घरी जाऊन काही घडलेच नाही अशा आविर्भावात त्याने कर्ज फेडण्यासाठी कैलासच्या मोबाईलवरून कैलासचा भाचा जीवन ज्ञानेश्वर निकम रा. सावरगाव यांच्या मोबाईलवर व्हाट्सअपवर ‘बेपत्ता कैलास माझ्या ताब्यात असून, तुम मुझे 30 लाख रुपये दो नहीं तो उसकी लाश भी नही मिलेगी’ असा संदेश वारंवार टाकून खंडणीची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी रात्री संशयित संजय राजेंद्र मोरे यास ताब्यात घेऊन घटनास्थळावर जाऊन मृतदेह खड्डूयातून बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह कुजलेला असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवरच पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. कैलास हा आरोपी संजय राजेंद्र मोरे यांचा चुलत साडू असून कैलासच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे लहुजी घोडे सचिन सोनार राजेंद्र काकडे, अनंत जोशी, रंगराव बावस्कर, ज्ञानदेव ढाकणे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास केला.