
बेभरोसे कारभारामुळे खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह आणि नाट्यगृहाचा गेल्या सात वर्षांपासून पडदा उघडलेलाच नाही. नाट्यगृहातील एसी, पंखे गायब झाले आहेत. तसेच महागड्या खुर्य्याही तुटलेल्या आहेत. नाट्यगृहाची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याने नाट्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
खोपोली शहरात नाट्य चळवळीला वाव मिळावा, नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे सोपे जावे, नवोदित कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी रंगमंच मिळावा यासाठी 12 वर्षांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने 16 कोटींचा निधी खर्च करून छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची निर्मिती केली होती.
डिजिटल साऊंड सिस्टीम व वीज व्यवस्था आहे. आलेल्या कलाकारांसाठी आरामकक्ष, मेकअप रूम, स्वच्छतागृहे आहेत. नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्यानंतर सुरुवातीची अडीच वर्षे येथे नाटकांचे प्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमित पार पडले. नंतर पालिका प्रशासनाकडून देखभाल होत नसल्याने या नाट्यगृहाची अवस्था दयनीय झाली आणि अखेर हे नाट्यगृह बंद झाले. त्यानंतर प्रशासनाने नाट्यगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नाट्यगृहाला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर नगरपालिकेने नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद केली.
सहा महिन्याची प्रतीक्षा
गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. नाट्यगृहाच्या कामाला अजून सहा महिने लागणार असल्याने संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेने आर्थिक तरतूद केली असून सभागृहाचे बाहेरील काम पावसाळ्यापूर्वी होतील, तर अंतर्गत कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा व तांत्रिक अटी-शर्तीनुसार व्हावीत यासाठी खास अभियंता नियुक्त केला आहे असे खोपोली मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी सांगितले.