इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानी महिला संघांने शतकी गुणांचा चौकार मारत बांगलादेशाचा पराभव केला. हिंदुस्थानी संघाची कर्णधार प्रियांका इंगळेने जबरदस्त खेळ केला, तिला रेश्मा राठोडने व नसरीन शेखने मोलाची साथ दिली. हिंदुस्थानसाठी हा विजय खूप मोलाचा होता. आता उपांत्यफेरीत फेरीत द. आफ्रीकेविरुध्द लढत होणार आहे.
हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना हिंदुस्थानने 50 गुणांची कमाई केली. तर संरक्षणात 6 ड्रीम रन मिळवत मध्यंतराला 56-08 अशी मोठी आघाडी घेतली होती. तर मध्यंतरानंतर तोच धडाका कायम राखत हिंदुस्थानने बांगलादेशचा 109-16 असा 93 गुणांनी धुव्वा उडवत खो-खो विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सामन्याचा आढावा:
दुसऱ्या टर्नमध्ये हिंदुस्थानी संघाने आपली पकड आणखी मजबूत केली. प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, आणि रेशमा राठोड यांनी अप्रतिम ड्रीम रन साकारत तब्बल 5 मिनिटे 36 सेकंद खेळ केला. भारताने या टर्नमध्ये 6 गुण जोडले.
तिसऱ्या टर्नमध्ये हिंदुस्थानने पुन्हा वर्चस्व गाजवत शंभर गुणांचा टप्पा पार केला. रेशमा राठोडच्या प्रभावी स्काय डाईव्हने संघाने आपला विजय सुनिश्चित केला. या टर्नच्या शेवटी स्कोर 106-8 असा होता.
शेवटच्या टर्नमध्येही भारताचा खेळ एकतर्फी राहिला. हिंदुस्थानी संघाने आणखी तीन गुणांची ड्रीम रन साकारत सामना 109-16 अशा निर्णायक फरकाने जिंकला.
सामन्यातील पुरस्कार:
सामन्याचा सर्वोत्तम आक्रमक: मगई माझी ( हिंदुस्थान)
सामन्याचा सर्वोत्तम बचावपटू: ऋतुराणी सेन (बांगलादेश )
सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: अश्विनी शिंदे (हिंदुस्थान)