Kho Kho World cup – हिंदुस्थानने इराणला लोळवले, महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत धडाकेबाज प्रवेश

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने इराणला अक्षरशः लोळवल. दक्षिण कोरियाविरुद्धच्या ऐतिहासिक 175-18 अशा विजयानंतर, बुधवारी इराणला 84 गुणांनी पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले.

या सामन्यात भारतीय खो-खो खेळाडूंनी इराणच्या खेळाडूंना चांगलेच पळवले. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात हिंदुस्थानच्या महिलांनी 100-16असा मोठा विजय मिळवला. या कामगिरीने त्यांना गटात अव्वल स्थान मिळवून दिले आहे.

पहिल्या टर्नमध्ये त्यांनी इराणच्या पहिल्या बॅचला हिंदुस्थानने अवघ्या 33 सेकंदांत बाद केले. अश्विनीने आघाडी घेत संघासाठी सुरुवातीलाच गुण मिळवले, तर मीनूने आपला शानदार फॉर्म कायम राखत अनेक सहज स्पर्शाने गुण मिळवले. पहिल्या टर्नमध्येच भारतीय संघाने 50 गुणांची कमाई केली.

सामना पुढेही एकतर्फी राहिला. तिसऱ्या टर्नच्या शेवटी हिंदुस्थानचे 93 गुण झाले होते व शेवटच्या टर्न मध्ये 7 ड्रीम रन करत हिंदुस्थानने गुणांची शंभरी गाठली. वझीर निर्मलाच्या डावपेचांच्या कौशल्याने आणि कर्णधार प्रियांका इंगळे, निर्मला भाटी आणि नसरीन यांच्या योगदानामुळे भारताने आणखी एक प्रभावी व मोठा विजय साजरा केला. या विजयामुळे भारताने या स्पर्धेतील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

सामन्यातील पुरस्कार:
•सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू: मोबिना (इराण)
•सर्वोत्कृष्ट बचावपटू: मीनू (हिंदुस्थान)
•सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: प्रियांका इंगळे (कर्णधार – हिंदुस्थान)