सलामीलाच थराराचा गोडवा, पहिल्या खो-खो विश्वचषकाची चपळ सुरुवात, उद्घाटनीय लढतीत नेपाळने हिंदुस्थानला झुंजवले

मऱ्हाटमोळ्या खो-खोने आपल्या पहिल्याच सामन्यात जग जिंकण्याच्या दिशेने सूर मारला. पहिल्यावहिल्या विश्वचषकाच्या पहिल्यावहिल्या सामन्यात हिंदुस्थानने नेपाळविरुद्धचा थरार अवघ्या 5 गुणांनी जिंकत संक्रातीच्या पूर्वसंध्येला तमाम हिंदुस्थानींना विजयाची गोड भेट दिली. हिंदुस्थान खो-खोचा जन्मदाता असला तरी नेपाळच्या संघाने आम्ही तुमच्याच पावलांवर पावले टाकत असल्याचे सलामीच्याच सामन्यात दाखवून दिले.

गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चपळता दाखवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या हिंदुस्थानी खो-खोने आज खऱया अर्थाने कात टाकली. स्पर्धेत पुरूषांचे 20 आणि महिलांचे 19 संघ सहभागी करून खो-खो महासंघाने अर्धी लढाई आधीच जिंकली होती. आज हिंदुस्थान-नेपाळ लढतीने खो-खोचे नवे पर्व थरारक असणार याचा दाखला दिला. यजमान हिंदुस्थान खो-खो वर्ल्ड कपचा संभाव्य दावेदार असला तरी नेपाळच्या खेळाडूंनी केलेला खेळ खो-खोची छाती अभिमानाने फुगवणारा ठरला.

हिंदुस्थानने जोरदार आक्रमणाने सुरूवात करताना नेपाळविरुद्ध पहिल्या डावात 24 गुणांची कमाई केली तर नेपाळनेही हिंदुस्थानला चोख प्रत्युत्तर देताना 20 गुण संपादले. त्यामुळे हिंदुस्थानला 4 गुणांची माफक आघाडी मिळवता आली. दुसऱया डावात हिंदुस्थानच्या आक्रमकांनी 18 गुणांची नोंद करत नेपाळसमोर 23 गुणांचे आव्हान ठेवले होते. तेव्हा नेपाळच्या रोहित कुमार बर्माने अफलातून खेळ करत हिंदुस्थानी संरक्षकांचा घामटा काढला होता. पण अखेर अनुभवी हिंदुस्थानने हा थरार 42-37 असा पाच गुणांनी जिंकला. हिंदुस्थानचा सिवा रेड्डी सामन्यातील उत्कृष्ट आक्रमक ठरला तर सर्वोत्तम संरक्षकाचा पुरस्कार नेपाळच्या रोहित बर्माने मिळवला. आदित्य गणपुले सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

देखणा उद्घाटन सोहळा

पहिल्यावहिल्या खो-खो वर्ल्ड कपचा उद्घाटन सोहळा संस्मरणीय करण्यासाठी आयोजकांनी कोणतीही कसर सोडली नाही. हिंदुस्थानच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱर्या सोहळ्याचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. खो-खोच्या पुंभमेळ्यासाठी आलेल्या पुरूषांच्या 20 आणि महिलांच्या 19 अशा एपंदर 39 संघांनी ध्वजसंचलन करत मैदानाला प्रदक्षिणा घातली. या संचलनात हिंदुस्थानच्या महिला साडीत तर पुरूष संघ ब्लेझर परिधान करून आले होते. या सोहळ्याला पेंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवियांसह खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी, सहसचिव चंद्रजीत जाधव उपस्थित होते.

देखो देखो आजच्या लढती

पुरूष गट ः द. आफ्रिका-घाना वेळ ः 10.30, बांगलादेश- श्रीलंका 11.15, अर्जेंटिना- इराण 13.00,

इंग्लंड-जर्मनी 11.15, घाना-नेदरलँडस 11.15, पेरू- भूतान 12.30, अर्जेंटिना-इराण 13.00, द. कोरिया-पोलंड 14.45, मलेशिया- केनिया 16.00, द. आफ्रिका- नेदरलॅण्डस 16.30, बांगलादेश-अमेरिका 17.15, इंग्लंड ऑस्ट्रेलिया 18.30, नेपाळ- पेरू 18.30, घाना-अर्जेंटिना 19.45, हिंदुस्थान-ब्राझील 20.15.

महिला गट ः नेपाळ- भूतान 10.00, , द. आफ्रिका-न्यूझीलंड 10.00, इंग्लंड- ऑस्ट्रेलिया वेळ ः 11.45, श्रीलंका-बांगलादेश 12.30, केनिया- नेदरलॅण्डस 15.15, नेपाळ-जर्मनी 16.00,द. आफ्रिका-पेरू 17.15,इंग्लंड-युगांडा 17.45, हिंदुस्थान-दक्षिण कोरिया 19.00, इराण-मलेशिया 19.45.