Kho-Kho World Cup 2025 – ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाला सुरुवात, दिल्लीत क्रीडारसिकांचा उत्साह शिगेला

हिंदुस्थानचा पारंपरिक खेळ असलेल्या ‘खो-खो’च्या पहिल्या विश्वचषकाला राजधानी दिल्लीमध्ये भव्य सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी 23 देशांमधील 39 संघ दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीमधील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये क्रीडारसिकांनी उत्साह पहायला मिळत आहे. खो-खो विश्वचषकामुळे दिल्लीला एकप्रकारे कुंभमेळ्याचे स्वरुप आले आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषकासाठी सज्ज झाले आहे. जगभरातून 23 देशांमधील 39 संघ आपले नशीब आजमावण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. या स्पर्धेतपुरुषांच्या 20 आणि महिलांच्या 19 संघांमध्ये चढाओढ पहायला मिळणार आहे. यापूर्वी विविध खेळांचा दिल्लीमध्ये आवाज घुमला आहे, पंरतु आता पहिल्यांदाच खो-खो चा आवाज दिल्लीमध्ये घुमणार आहे. पांरपरिक खेळ म्हणून खो-खो पुर्वापार हिंदुस्थानात खेळला जात आहे. परंतु पहिल्यांदाच विश्वचषकाच्या रुपात खेळातील सुंदरता जगभरातील क्रीडारसिकांना पाहता येणार आहे. एकेकाळी अत्यंत साध्या स्वरूपात खेळला जाणारा हा खेळ आता आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाला आहे. यामुळे खो-खो खेळाच्या प्रगतीचा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम पारंपरिक हिंदुस्थानी सजावटीसह विविध देशांच्या रंगांनी नटले आहे. या सोहळ्यात खेळाडूंच्या सांस्कृतिक आदान-प्रदानाची झलक पाहायला मिळणार आहे.

आशियाई संघांचा उल्लेखनीय सहभाग

आशियाई संघांनी या स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. इराण, मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाळ आणि दक्षिण कोरिया हे संघ आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या देशांमध्ये मध्यंतरीच्या काळात हिंदुस्थानातू प्रशिक्षक दिले होते. त्यामुळे त्या-त्या देशात खो-खो सुरु झाला व आता ते संघ पुरुष आणि महिला गटांमध्ये जोरदार लढत देतील, अशी अपेक्षा आहे.

पाश्चात्त्य देशांची नवी वाटचाल, खो-खो ची मुसंडी

पाश्चात्त्य देशांमध्ये अमेरिका, पोलंड, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांचा सहभाग विशेष ठरणार आहे. या देशांमध्ये खो-खो हा खेळ नव्याने सुरू झाला आहे. परंतु त्यांचा सहभाग त्या-त्या देशांमध्ये खो-खो खेळाला सरावाने आपला करू लागले आहेत. याशिवाय, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दक्षिण गोलार्धातील देशही उत्साहात सहभागी झाले आहेत. अर्जेंटिनाचा सहभाग दक्षिण अमेरिकेतील खो-खोला मिळालेली देणगी ठरणार आहे. यापूर्वी हिंदुस्थान व इंग्लंड या देशांनी एकमेकांच्या देशात जाऊन खो-खो स्पर्धा खेळली होती. त्यामुळेच इंग्लंडचा सहभाग या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवताना दिसतो.