Kho-Kho World Cup 2025 – हिंदुस्थानच्या मुलींची कमाल, दक्षिण कोरियाचा 157 गुणांनी उडवला धुव्वा

दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने आपल्या मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर खेळलेल्या या सामन्यात हिंदुस्थानी महिलांनी दक्षिण कोरियाचा 157 गुणांनी पराभव करत प्रेक्षकांना जल्लोषात सहभागी करून घेतले.

दक्षिण कोरियाच्या महिला संघाने सुरुवातीला जोरदार प्रयत्न केले आणि हिंदुस्थानी महिलांच्या काही खेळाडूंना बाद करून प्रेक्षकांची दाद मिळवली. मात्र, अनुभवी टीम इंडियाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवत गुणांचा वर्षाव केला. मध्यंतराला टीम इंडियाने 94-10 अशी आघाडी घेतली होती. ती सामना संपेपर्यंत संघाने कायम ठेवत गुणांमध्ये वाढ करत नेली. सामना संपला तेव्हा टीम इंडिया 175 आणि दक्षिण कोरिया 18 गुणांवर होती. महिलांच्या या विक्रमी विजयामुळे उपस्थित चाहत्यांची मकर संक्रांत गोड झाली.

टीम इंडियाची स्टार खेळाडू नसरीन शेख हिने अप्रतिम कामगिरी करत सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला. तिच्या आक्रमक खेळाने आणि स्मार्ट रणनीतीने संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मदत झाली. सामना संपल्यानंतर हिंदुस्थानी समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. प्रेक्षकांनी संपूर्ण सामन्यात संघाचे उत्साह वाढवला. मकर संक्रांतीच्या दिवशी मिळालेला हा मोठा विजय देशभरात क्रीडप्रेमींसाठी आनंदाचा क्षण ठरला. या दमदार विजयानंतर हिंदुस्थानी महिलांचा आत्मविश्वास उंचावला आहे.