खो-खो बोला, प्रतिस्पर्ध्यांना झोड झोड झोडा! हिंदुस्थानी महिलांनी द. कोरियाला 175-18 असे झोडपले

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आज खोखोचा आवाज घुमला. खोखोत हिंदुस्थानचाच दबदबा असल्याचे दाखवून देताना महिला संघाने खोखो बोलत नवख्या आणि कमकुवत दक्षिण कोरियन संघाचा अक्षरशः पालापाचोळा करत विक्रमी 175 गुणांची कमाई करत आपला सलामीचा सामना 175-18 असा 158 गुणांनी जिंकला. तसेच खोखो विश्वचषकाच्या अन्य झालेल्या सामन्यात पुरुष गटात दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंड या संघाने सलग दोन विजयांची नोंद केली. विशेष म्हणजे खोखोच्या आजच्या लढती सर्वच संघांनी खोखो बोलत प्रतिस्पर्ध्यांना झोड झोड झोडले

स्पर्धेचा दर्जा आंतरराष्ट्रीय, खेळणारे संघ गल्लीपेक्षा सुमार

आज दिल्लीत खऱया अर्थाने खो-खोचा आवाज घुमला. पहिल्या दिवशी विदेशी संघांचा खेळ पाहाण्यासाठी क्रीडाप्रेमींची तुरळक गर्दी झाली होती, पण संघांचा खेळ पाहिल्यावर साऱयांची घोर निराशा झाली. स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा आणि ग्लॅमर मिळवून देण्यासाठी हिंदुस्थानी खो-खो संघटनेने कोणतीही कसर सोडली नाही. स्पर्धेसाठी जगभरातील 39 संघांना एका व्यासपीठावर आणण्याची किमया साधली. मात्र सामना सुरू झाल्यानंतर जो खेळ पाहायला मिळाला त्याचा दर्जा सुमार होता. गल्लीत खेळणाऱया संघांनाही त्यांच्यापेक्षा आम्ही बरे असे वाटावे असे दृश्य प्रत्येक सामन्यात पाहायला मिळाले. दक्षिण  आफ्रिका आणि घाना यांच्यात दिवसातला पहिला सामना सुरू झाला आणि दोन्ही संघांच्या पकडापकडीच्या खेळात आफ्रिकेने 87-32 अशी घानावर मात केली. या सामन्याचे आकडे मोठे असले तरी हा सामना अत्यंत एकतर्फी आणि पंटाळवाणाच झाला होता. त्यानंतर खेळला गेलेला प्रत्येक सामना एकतर्फीच झाला. विशेष म्हणजे एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला लढत देता आली नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने घानावर मात केल्यानंतर नेदरलॅण्ड्सचा 122-14 असा शतकी धुव्वा उडवला. बांगलादेशनेही आपल्या दोन्ही सामन्यात मोठे विजय नोंदवले. त्यांनी श्रीलंकेचा 56-24 तर अमेरिकेचा 85-26 असा धुव्वा उडवला. इंग्लंडनेही सलग दोन विजय मिळवताना आधी जर्मनीचा 60-38 तर ऑस्ट्रेलियाचा 48-27 असा फडशा पाडला.

हिंदुस्थानी महिलांचा विश्वविक्रमी विजय

सोमवारी हिंदुस्थानच्या पुरुष संघाला अवघ्या 5 गुणांनी विजय नोंदविता आला होता. पण आज झालेल्या सर्वच सामन्यात अक्षरशः गुणांनी धुमाकूळ घातला. त्यात सर्वोच्च शिखरावर हिंदुस्थानी महिला विराजमान झाल्या. दक्षिण कोरियाच्या पुरुषांनी पोलंडवर मोठा विजय मिळवल्यानंतर महिलाही जोरदार खेळ करतील अशी अपेक्षा होती, पण कोरियन महिलांनी अपेक्षाभंग केला. सामन्याच्या सुरूवातीला कोरियन जोरदार प्रयत्न करताना दिसले, पण नंतर त्यांना खो-खोच कळेनासे झाले. खो-खोच्या मैदानात कसे संरक्षण करावे आणि कसे आक्रमण करावे याची कसलीही कल्पना नसलेल्या दक्षिण कोरियन महिलांना हिंदुस्थानी महिलांनी धू धू धुतले. मध्यंतराला 94-10 अशी विजयी आघाडी घेणाऱया हिंदुस्थानने सामना 175-18 असा विक्रमी फरकाने जिंकला. खो-खोच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके प्रचंड गुण टिपता आले आहेत.

वासरात लंगडी गाय शहाणी

खो-खोमध्ये आंतरराष्ट्रीय संघांचा विचार केला तर हिंदुस्थानसह इराण, नेपाळ आणि बांगलादेश या संघांचाच खेळ स्पर्धात्मक आहे. हे आशियाई संघ हिंदुस्थानी संघांच्या तुलनेत बलाढय़ नसले तरी लढत देत आले आहेत. त्यामुळे आज आशियाई संघांनी ‘वासरात लंगडी गाय शहाणी’चा प्रत्यय देताना युरोपियन आणि आप्रैकन संघांवर सहज मात केली. आशियातील बांगलादेशसह नेपाळ, दक्षिण कोरिया, इराण या देशांच्या पुरुष आणि महिला संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव केला. एक मलेशिया सोडला तर आशिया विरुद्ध अन्य देश अशा झालेल्या सर्व लढतीत आशियाई संघच विजयी ठरले.