हिंदुस्थानची राजधानी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषकाला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेतमध्ये 23 देशांमधील 39 संघांनी सहभाग नोंदवला आहे. पहिला सामना हिंदुस्थान आणि नेपाळ यांच्यामध्ये खेळवला गेला. नेपाळने कडवी झूंज देत विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु हिंदुस्थानने त्यांचे मनसुबे उधळून लावत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
हिंदुस्थान विरुद्ध नेपाळ या उद्घाटनीय सामन्यात नेपाळने हिंदुस्थानला चांगली लढत दिली. अनुभवी हिंदुस्थानी खेळाडूंपुढे नेपाळचा निभाव लागणार नाही, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु नेपाळने दमदार खेळ करत सामन्यात रंगत निर्माण केली. मध्यंतरापर्यंत 24-20 अशा फरकाने हिंदुस्थानचा संघ पुढे होता. परंतु नेपाळच्या खेळाडूंनी सुद्दा तितक्याच ताकदीने खेळ करत, लीड वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. अखेर हिंदुस्थानने नेपाळचा 42-37 अशा फरकाने पराभव केला आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.