महाराष्ट्राचे खो-खोपटू होणार कोटय़धीश, जगज्जेतेपद पटकावल्यानंतर राज्य शासनाचा 3 कोटींचा पुरस्कार हमखास मिळणार

मंगेश वरवडेकर

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला, वाढलेला, रुजलेला सामान्यांचा खो-खो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्यावहिल्या खो-खो वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानच पहिला जगज्जेता होणार, हे सांगायला कुणाच्याही भविष्यवाणीची गरज नाही. त्यातच महाराष्ट्र शासनाने गेल्याच वर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना पाच कोटी तसेच वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला किंवा खेळाडूंना तीन कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मान करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या पुरुष संघात असलेले महाराष्ट्राचे पाच आणि महिला संघात असलेल्या महाराष्ट्राच्या तिघी कोटय़धीश होणार हे जवळजवळ निश्चित आहे. या बातमीने महाराष्ट्राच्या खो-खो विश्वात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये पहिलावहिला खो-खो वर्ल्ड कप खेळवला जाणार असला तरी यात हिंदुस्थानच्या वेगवान खेळाला खेळत असलेल्या सर्व संघांपैकी एकाही संघाला आव्हान देणे अशक्यप्राय आहे. खो-खोचा जन्मदाता असलेला हिंदुस्थान या वर्ल्ड कपमध्येही सर्वच संघांचा बाप आहे. हिंदुस्थानच्या भन्नाट खेळापुढे सर्वच संघ नर्सरीतले संघ भासले तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण स्पर्धेत उतरलेल्या निम्म्यापेक्षा अधिक संघांना आंतरराष्ट्रीय सोडा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचाही अनुभव नसल्याचे दिसत आहे. दोन-तीन आशियाई संघ वगळता अन्य संघ अत्यंत दुबळे आणि कमकुवत असल्यामुळे अन्य लढती काहीशा निश्चित रंगतील, पण हिंदुस्थानच्या सर्वच लढती एकतर्फी आणि महाविजयाच्या असतील, हे स्पष्ट आहे. हिंदुस्थानचे खेळाडू या वर्ल्ड कपमध्ये अनेक विश्वविक्रम रचतील, हेसुद्धा निश्चित आहे.

हिंदुस्थानात सबसे आगे महाराष्ट्रच

हिंदुस्थानी संघात सर्वात जास्त खेळाडू महाराष्ट्राचेच आहेत. पुरुष संघात प्रतीक वाईकर (कर्णधार), सुरेश गरगटे, आदित्य गणपुले, रामजी कश्यप, अनिकेत पोटे तर महिला गटात प्रियंका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड यांचा समावेश आहे. तसेच प्रशिक्षकपदीही महाराष्ट्राच्याच दिग्गजांची वर्णी  लागली आहे. हिंदुस्थानी संघ जगज्जेता झाल्यावर हे सारेच मालामाल होतील.

सामान्यांचा खो-खो श्रीमंत होणार – देशमुख

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला खो-खो आता सातासमुद्रापार पोहोतचोय, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बलाढय़ हिंदुस्थानच जगज्जेता होणार याचा मला विश्वास आहे. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जागतिक स्पर्धा किंवा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील खेळाडू तीन कोटींचा विजेता होणार. हा पुरस्कार नक्कीच महाराष्ट्रातील आठही सामान्य कुटुंबातील खो-खोपटू मिळवणार, याचीही मला खात्री आहे. खो-खोपटूंना करोडपती करणारा हा पुरस्कार खो-खो खेळाचीही लोकप्रियता शिखरावर पोहोचवणार, याचाही मला दृढ विश्वास असल्याचे मुंबई जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष ऍड. अरुण देशमुख म्हणाले. सुधांशु मित्तल, महेंद्रसिंग त्यागी आणि चंद्रजीत जाधव यांच्या अथक प्रयत्नांनी खो-खोचा सुवर्णकाळ सुरू झाला असून येत्या दशकभरात खो-खो आणि कबड्डी हे दोन्ही हिंदुस्थानी खेळ ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवतील, याचीही खात्री आहे.