जमीन गावकीला देण्यास विरोधावरुन, रोह्याच्या बारशेतमध्ये खेराडे कुटुंब वाळीत; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

वडिलोपार्जित जमीन गावकीला देण्यास विरोध केल्याची शिक्षा म्हणून बारशेत गावातील खेराडे कुटुंबाला वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकीच्या सभेमध्ये खेराडे कुटुंबीयांवर निर्बंध ठेवण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार या कुटुंबीयांची इंटरनेट केबल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत बोलण्यास इतर ग्रामस्थांना बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुरेश खेराडे यांची बारशेत गावात वडिलोपार्जित जमीन असून शेती हा त्यांच्या प्रमुख व्यवसाय आहे. ग्रामस्थांच्या दबावाखाली खेराडे कुटुंबीयांनी याआधीही 15 एकर जमीन गावकीला देऊनही ग्रामस्थ आणखी 15 एकर जमीन गावकीच्या नावावर करण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप सुरेश खेराडे यांनी केला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी सभेमध्ये वाळीत टाकण्याचा ठराव करत खेराडे यांचा विविध प्रकारे मानसिक छळ सुरू केला. याप्रकरणी खेराडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बारशेत ग्रामस्थ कमिटीमधील सदस्य नारायण पवार, विजय पवार, अनिल पवार, भगवान पवार, सुधीर आगरे, भास्कर पवार, शांताराम खराडे, प्रकाश कदम, विजय पवार या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ही जमीन गावकऱ्यांच्या सार्वजनिक वहिवाटीची असून खेराडे कुटुंबीयांनी केलेला आरोप खोटा असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक बहिष्कार व त्यातून अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
रवींद्र दौंडकर, पोलीस उपविभागीय अधिकारी, रोहा