केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी गतवर्षीच्या (2024) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकवारी नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळातील जगज्जेता डी. गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग व पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार या चार खेळाडूंना देशातील सर्वोच्च असा ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार जाहीर झाला. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने चार खेलरत्न अन् 34 अर्जुन पुरस्कारार्थी खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे, यात 17 पॅरा खेळाडूंचा समावेश आहे. आता 17 जानेवारीला सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात या पुरस्कार विजेत्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये एकाही क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला नाही.
हे पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱया ‘खेलरत्न’ पुरस्कारच्या यादीत मनू भाकरचे नाव नसल्याने मोठा वाद झाला होता. मात्र जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये मनू भाकरला अखेर हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. अवघ्या 22 वर्षांच्या मनू भाकरने ऑगस्टमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकून इतिहास घडविला होता. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र हिंदुस्थानातील मनू ही पहिली हिंदुस्थानी अॅथलीट बनली आहे. दरम्यान याच ऑलिम्पिक स्पर्धेत हरमनप्रीत सिंगने त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी हॉकी संघाला सलग दुसरे कांस्यपदक मिळवून दिले होते. याचबरोबर नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत 18 वर्षांच्या डी. गुकेशने जगज्जेतेपद पटकावले होते. तो ही स्पर्धा जिंकणारा आतापर्यंतचा सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे. याबरोबर त्याने गेल्या वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये हिंदुस्थानी संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
जाहीर झालेल्या या ‘खेलरत्न’ पुरस्कारार्थींमध्ये चौथे नाव पॅरा अथलीट प्रवीण कुमार याचे आहे. प्रवीण कुमारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये टी 64 चॅम्पियन म्हणून गौरविण्यात आले होते. ज्या खेळाडूंना गुडघ्याच्या खाली एक किंवा दोन्ही पाय नसतात ते टी 64 प्रकारच्या खेळात सहभागी होत असतात.
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार ः
मनू भाकर (नेमबाज), डी. गुकेश (बुद्धिबळ), हरमनप्रीत सिंग (हॉकी), प्रवीण कुमार (पॅरा अॅथलिट).
अर्जुन पुरस्कार ः
ज्योती यराजी (अॅथलिट), अन्नू रानी (अॅथलिट), स्विटी (बॉक्सिंग), नीतू (बॉक्सिंग), सलीमा टेटे (हॉकी), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जरमणप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत सिंह (हॉकी), राकेश कुमार (पॅरा तिरंदाज), प्रीती पाल (पॅरा अॅथलिट), जीवनजी दीप्ती (पॅरा अॅथलिट), अजित सिंह (पॅरा अॅथलिट), सचिन खिलारी (पॅरा अॅथलिट), धर्मवीर (पॅरा अॅथलिट), प्रणव सुरमा (पॅरा अॅथलिट), सिमरन जी (पॅरा अॅथलिट), नवदीप (पॅरा अॅथलिट), नितेश कुमार (पॅरा अॅथलिट), तुलसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन), नित्या श्रु सुमती सिवान (पॅरा बॅडमिंटन), मनीष रामदास (पॅरा बॅडमिंटन), कपिल परमार (पॅरा ज्युदो), मोना अग्रवाल (पॅरा नेमबाज), रुबीना फ्रान्सिस (पॅरा नेमबाज), स्वप्नील कुसाळे (नेमबाज), सरबजीत सिंह (नेमबाज), अभय सिंह (स्क्वॅश), सजन प्रकाश (जलतरण), अमन (कुस्ती), सुचा सिंह-अॅथलिट (लाइफटाइम अर्जुन पुरस्कार), मुरलीकांत पेटकर- पॅरा स्वीमिंग (लाइफटाइम अर्जुन पुरस्कार).
द्रोणाचार्य पुरस्कार ः सुभाष राणा (पॅरा-नेमबाज), दीपाली देशपांडे (नेमबाज), संदीप सांगवान (हॉकी).
जीवनगौरव पुरस्कार (द्रोणाचार्य लाईफटाइम) ः एस. मुरलीधरन (बॅडमिंटन), अरमांडो एगनेलियो कोलाको (फुटबॉल).
क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार ः फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया
मौलाना अबुल कलाम आझाद (माका) पुरस्कार चंदिगड युनिव्हर्सिटी (मुख्य पुरस्कार), लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (पहिले उपविजेते), गुरू नानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसर (दुसरे उपविजेते)
‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ हा हिंदुस्थानातील सर्वोच्च नागरी क्रीडा पुरस्कार होय. या सन्मानाअंतर्गत पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला 25 लाख रुपये देऊन गौरविण्यात येते. यासोबतच ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रही देण्यात येते. याआधी खेलरत्न पुरस्कारार्थी खेळाडूंना फक्त 7.5 लाख रुपये मिळत होते, परंतु 2020 मध्ये ते 25 लाख रुपये करण्यात आले. ‘अर्जुन’ पुरस्कारार्थींना आधी 10 लाख मिळायचे, ते आता 15 लाख करण्यात आले आहे. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी 10 लाख, तर द्रोणाचार्य लाइफटाइम (जीवनगौरव) पुरस्कारासाठी 15 लाख रुपये देऊन सन्मानित केले जाते.