खेळ महोत्सवाअंतर्गत दक्षिण मध्य मुंबईत आज विविध स्पर्धा, योगासने… मल्लखांब… जिम्नॅस्टिक… अ‍ॅक्रोबॅटिक्स

mallakhamb-win

शिवसेनेच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईत सुरू असलेल्या सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाअंतर्गत उद्या, रविवारी योगासने, मल्लखांब (महिला व पुरुष), जिम्नॅस्टिक्स, अ‍ॅक्रोबॅटिक्स, पंजा आणि चित्रकला या स्पर्धा पार पडणार आहेत. 15 जानेवारीपासून हा खेळ महोत्सव सुरू झाला असून 16 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरू झाला आहे. उद्या, रविवारी योगासने, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स व अॅक्रोबेटिक्स या स्पर्धा गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स मैदान, वाशी नाका चेंबूर या ठिकाणी तर पंजा स्पर्धा धारावी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स येथे पार पडणार आहे. या सर्व स्पर्धांकरिता अनुक्रमे 45 हजार, 45 हजार आणि 46 हजार अशा रकमेची एकूण रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

चित्रांतून शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याची आणि आदर्शाची आठवण साजरी करण्यासाठी उद्या चेंबूर, अणुशक्तीनगर, शीव, वडाळा, धारावी आणि माहीम या सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अडीच लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे असून 4500 स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पूर्णपणे विनाशुल्क आहे आणि ती इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. गटनिहाय प्रत्येक क्षेत्रात विशिष्ट चित्रकलेचे विषय दिले गेले आहेत. 8 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण व विजेत्यांना शिवसेना भवन, दादर येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

पारंपरिक खेळांना मिळणार प्रोत्साहन

योगासने, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स व अॅक्रोबॅटिक्स, पंजा आणि चित्रकला या सर्व स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील 800 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या माध्यमातून पारंपरिक आणि कलात्मक खेळांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत असल्याची भावना खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे.