उद्योगनगरीत खून, गोळीबार, महिला, बालकांवरील लैंगिक अत्याचार, वृद्धांची फसवणूक, चोऱ्यामाऱ्या, अमली पदार्थांसह पिस्तुलांची तस्करी अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत प्रत्येकजण असुरक्षित असतानाच आता पोलीसही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे चक्क पोलीस अंमलदाराच्या घरावरच सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. ही घटना रविवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली. दरोडेखोरांना प्रतिकार करताना पोलीस अंमलदार जखमी झाले.
अनिकेत पंडित दौंडकर (वय – 25, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे. दौंडकर हे भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दौंडकर यांचा शेलपिंपळगाव येथे बंगला आहे. शनिवारी रात्री दौंडकर हे घरात कुटुंबासह झोपले होते. मध्यरात्री अडीच वाजता सहा दरोडेखोर दौंडकर यांच्या घरात शिरले. सोन्याचे दागिने व रोकड चोरून चोरटे पसार होण्याच्या प्रयत्नात होते. याचवेळी दौंडकर जागे झाले. त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी क्रिकेटच्या स्टम्पने एका चोरट्याच्या डोक्यात मारले. त्यात चोरटा जखमी झाला.
मात्र, दुसऱ्या चोरट्याने दौंडकर यांच्या डोक्यात कोयत्यासारख्या हत्याराने वार केला. प्रसंगावधान राखत दौंडकर यांनी तो हातावर घेतला, त्यामुळे दौंडकर बचावले. त्यानंतर चोरटे पळून गेले. दरोडेखोरांनी दौंडकर यांच्या घरातून 42 हजार 500 किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 12 हजार 500 रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा 55 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दौंडकर यांना उपचारासाठी भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जऱ्हाड तपास करीत आहेत.
चोऱ्या, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
शहरात गेल्या काही महिन्यांत घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत पोलीस आयुक्तालय हद्दीत दरोड्याच्या 14 घटना घडल्या आहेत. घरफोडीच्या 224, जबरी चोरीच्या 160, तर वाहनचोरीच्या 858 घटना घडल्या आहेत.
दरोडखोरांच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. दौंडकर यांनी प्रतिकार करताना एका चोरट्याला स्टम्पने मारल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे. लवकरच दरोडेखोर हाती लागतील.”
– राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त