महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचे नियोजन योग्यरीत्या करा. यात्रा अपघाताविना आनंदात पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. दरम्यान, प्रशासन करीत असलेल्या कामाचे देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
पाल येथील खंडोबा-म्हाळसादेवीच्या यात्रेचा शनिवारी (११ रोजी) मुख्य दिवस आहे. त्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत प्रशासन, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी आमदार मनोज घोरपडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यात्रेच्या अनुषंगाने केलेली तयारी, तसेच राहिलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी पाटील यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मंदिरासह परिसरात उभारण्यात येत असलेली दर्शनबारी, पार्किंग व्यवस्था, रथ मिरवणूकमार्ग व लग्न सोहळा मंडपाची पाहणी त्यांनी केली. तसेच परिवहन विभाग, महावितरण, आरोग्य विभाग यांच्यासह बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेत उपस्थित अधिकाऱ्यांची उलटतपासणी घेतली.
सातारा आगारातून १४०, सांगलीतून १०० आणि इतर विभागांतून भाविकांसाठी ३२० जादा बसेसची सोय करण्यात आल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. त्यावर भाविक जसा येईल, तसा तो परत गेला पाहिजे. त्यासाठी बस थांब्याचे नियोजन करा, अन्न व औषध प्रशासनाने मेवामिठाई दुकानांमधील खाद्यपदार्थांची तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले. पालचा खंडोबा हे महाराष्ट्रसह अन्य राज्यांमधील भाविकांचे कुलदैवत असल्याने यात्रेला लाखो भाविक उपस्थित असतात. त्यांच्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाचा आराखडा लवकरच तयार करावा. पाल येथे आदर्श पद्धतीने नियोजन केल्यास पर्यटनालादेखील चालना मिळेल, असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.