खंडाळ्यात मृत्यूचा ‘घाट’, वर्षभरात 90 अपघात; 40 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील खंडाळा घाटाच्या हद्दीत दररोज असंख्य लहान – मोठे अपघात होत असतात. 2023 सालातील अपघातांपेक्षा 2024 सालातील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे पाहवयास मिळाले. तरीदेखील वर्षभरात जवळपास 90 अपघातांमध्ये 40 जण मृत्युमुखी पडले असून 38 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे खंडाळा जणू ‘मृत्यूचा घाट’ बनला आहे.

मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर दिवसभरात लाखो वाहनांचे जाणे येणे सुरू असते. सुरुवातीला सिमेंट काँक्रीटच्या या रस्त्यावरून सुसाट जाणाऱ्या वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना घडू लागल्या. यात खबरदारीचे उपाय म्हणून रस्त्यावर काही सुरक्षिततेचे उपाय योजण्यात आले. मात्र काही वर्षे उपाय तोकडे पडले असताना वाहन अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढत होते. तर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण चिंताजनक असताना वाहनाचा बेभान वेग, चुकीच्या पद्धतीने पुढील वाहनाला ओव्हरटेक करणे, लेनची शिस्त धाब्यावर बसवणे तर कधीतरी वेगातील वाहनाचा टायर फुटणे ही द्रुतगतीवरील अपघातामागची प्रमुख कारणे असल्याचे वारंवार स्पष्ट झाले होते.

602 विद्युत पोल बसवले

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघाताला आळा बसावा म्हणून या ठिकाणी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी अपघातांवर नियंत्रण मिळावे म्हणून एमएसआरडीसी माध्यमातून नवीन योजना राबवत एक्स्प्रेस वेवरील बोरघाटाच्या हद्दीतील किलोमीटर 36 ते किलोमिटर 45 दरम्यान जवळपास 602602 विद्युत पोल बसवत याठिकाणी रोषणाई करण्यात आल्याने रात्रीच्या अंधाराच्या वेळी अपघाताला आळा बसत आहे.