बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात आणि महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी या घटनेवर दिली आहे. बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या आहेत की, ”मी सकाळची सैफी अली खानच्या कुटुंबियांशी बोलले आहे. मुंबईचे पोलीस कमिशनर आणि त्या भागातील पोलीस इन्चार्ज यांच्याशीही माझं बोलणं झालं. खान फॅमिली अतिशय घाबरलेली आहे. आपलं जेव्हा लहान बाळ एका खोलीत असतं आणि त्या खोलीत एखादा व्यक्ती चाकू घेऊन शिरतो, तर फॅमिली घाबरणं हे साहजिकच आहे.”
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ”मुंबईत अगदी मोकळेपणाने जगायची आम्हाला सगळ्यांनाच सवयी आहे. म्हणून सगळ्यांकडे मोठी पोलीस यंत्रणा किंवा मोठी सिक्युरिटी, असं काही नसतं. पाईप किंवा कुठून हा माणूस खान कुटुंबियांच्या घरात शिरला, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील. बीड, परळी, वांद्रे किंवा बारामतीतील घटना असो, राज्यात आणि देशात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहे, असं डेटा सांगत आहे.”
सुळे म्हणाल्या, ”परभणी आणि बीड येथील कुटुंबाला जशी पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे, तशीच गरज आता सैफ अली खानच्या कुटुंबाला आहे. खान कुटुंब प्रचंड हादरून गेलं आहे.” त्या म्हणाल्या की, ”गेल्या दोन ते तीन महिन्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मुंबई माझ्या लहानपणापासून आम्ही 24 तास फिरतोय. मुंबई आणि महाराष्ट्रात फिरताना मला कधीही भीती वाटली नाही. रात्री आम्ही दौरे करून दोन आणि तीन वाजता पहाटे घरी येतो, घरी कोणाला काळजीही नसते. त्यांना माहित आहे, महाराष्ट्रात फिरतायंत काही प्रॉब्लेम नाही. मात्र आता लोकांना काळजी वाटायला लागली आहे.”