खालापूरकरांच्या पाणी योजनेचे 50 लाख ढापून ठेकेदार नॉट रिचेबल, अधिकारी म्हणतात कंत्राटदार फोनच घेत नाही, आम्ही काय करू?

खालापूरच्या टोपली-निगडोली गावाच्या पाणी योजनेचे तब्बल 50 लाख रुपये घेऊन कंत्राटदार नॉट रिचेबल झाला आहे. त्यामुळे वर्षभरापासून या योजनेतील खोदलेली विहीर अपूर्णच असून गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आश्चर्य म्हणजे याबाबत गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता कंत्राटदार आमचा फोनच घेत नाही, आम्ही काय करू? असे बेजबाबदार उत्तर देत आहेत. भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या या मिलीजुली कारभारामुळे खालापूरकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

नडोदे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या निगडोली गावाच्या पाणी योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. याबाबत आवाज उठवल्यानंतर शासनाने गावासाठी 50 लाख 77 हजार 723 रुपयांचा निधी मंजूर केला होता. योजनेचे कामही तातडीने सुरू करण्यात आले. मात्र विहिरीचे काम जेमतेम वीस टक्के होताच ठेकेदार शरद शिर्के गायब झाला आहे. याबाबत गावकऱ्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संतोष चव्हाण यांची भेट घेतली असता त्यांनी कंत्राटदार फोनच घेत नाही, आम्ही काय करू? असे उत्तर देत हात वर केले. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एखाद्याचा बळी गेल्यावर अधिकाऱ्यांना जाग येणार का?
कंत्राटदार शिर्के याने विहिरीचे काम अपूर्ण ठेवले असून या ठिकाणी कोणतीही सुरक्षेविषयी तरतूद केलेली नाही. त्यामुळे गुरेढोरे तसेच एखादा माणूस या उघड्या बोडक्या विहिरीत पडून अपघात होऊ शकतो. त्यामुळे एखाद्याचा बळी गेल्यावर अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भालेराव यांनी केला आहे.