
खडवली येथे ‘पसायदान विकास संस्था’ या नावाने चालवल्या जाणाऱ्या एका अनधिकृत वसतिगृहात मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये संस्थेच्या संचालकांचाही समावेश आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.
चाईल्ड हेल्प लाईनवर खडवली येथील ‘पसायदान विकास संस्थे’ बाबत तक्रार आली होती. तक्रारीमध्ये संस्थेत बालकांना मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना मारहाण तसेच अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संस्थेचा संचालक बबन शिंदे, त्यांची पत्नी आशा शिंदे, मुलगा प्रसन्न शिंदे, त्यांना मदत करणारा प्रकाश गुप्ता आणि दर्शना पंडित या पाच जणांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या सर्वच आरोपींना अटक करून त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी या सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
मुलींना विश्वासात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला
खडवली येथील पसायदान आश्रम शाळेत निराधार आणि गोरगरीब घरातील सुमारे 29 विद्यार्थी शिक्षण घेत होते. मुलींवर लैंगिक अत्याचार आणि मुलांना मारहाण केल्याची तक्रार आल्यानंतर ठाणे जिल्हा महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांनी अचानक या वस्तिगृहाला भेट दिली. पीडित मुली आणि मुले यांना सदस्यांनी विश्वासात घेतले. त्यानंतर या चिमुरड्यांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचला. जिल्हा प्रशासनाने या वस्तिगृहातील 29 मुला-मुलींची सुटका केली आहे.