खडकवासलातील इच्छुक भिडले; पक्ष निरीक्षकांपुढेच बाचाबाची

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भाजपकडून स्थानिक पातळीवर कल जाणून घेण्यासाठी केलेल्या मतदान प्रक्रियेचा फज्जा उडाल्यानंतर आता खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपमधील गट आमने-सामने येऊन एकमेकांना भिडले आहेत. पक्षाचे निरीक्षक मुन्ना महाडिक यांच्यासमोरच भाषण करू दिले नाही, या मुद्यावर आमदार भीमराव तापकीर आणि अन्य इच्छुकांमध्ये बाचाबाची झाली.

खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून आमदार भीमराव तापकीर यांच्याबरोबरच दिलीप वेडे पाटील आणि प्रसन्न जगताप, दीपक नागपुरे हेदेखील इच्छुक आहेत. पक्ष निरीक्षक मुन्ना महाडिक यांनी इच्छुकांना पक्ष कार्यालयामध्ये बैठकीसाठी बोलावले होते. मतदान प्रक्रिया आणि इच्छुकांची मते जाणून घेताना आमदार भीमराव तापकीर यांनी आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप अन्य इच्छुकांनी केला. मतदान प्रक्रिया राबवतानादेखील तीन इच्छुकांची नावे पक्षांतर्गत मतदारांना सांगण्यात आली नाहीत, असादेखील इच्छुकांचा आरोप आहे.

तापकीर हे खडकवासला मतदारसंघातून गेली तेरा वर्षे आमदार आहेत. यावेळी ते पुन्हा इच्छुक असून, त्यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्ष निरीक्षकांच्या समोर तापकीर यांनी कोणालाही बोलू न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे इच्छुक दिलीप वेडे पाटील, दीपक नागपुरे आणि प्रसन्न जगताप यांनी पक्ष निरीक्षकांच्या समोरच हरकत घेतली. आम्ही नवे इच्छुक आहोत, आम्हाला बोलू दिले नाही, या संदर्भात आपण वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे जगताप यांनी सांगितले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार बदला, अशी मागणी इच्छुकांची आहे. तापकीर यांना तीन वेळा संधी दिली. आता नव्या इच्छुकांना संधी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे तापकीर यांनीदेखील पुन्हा संधी मिळावी, यासाठी जोर लावला आहे.