Kerla Bus Accident – शाळेची बस उलटून भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू, 14 जण जखमी

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील वलक्काई भागात एक शाळेच्या बसला मोठा अपघात घडला. बुधवारी सायंकाळी वलक्काई पुलाजवळ बस चालकाचे उतारावरून नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर 14 विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरुमाथूर चिन्मय शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर त्यांच्या घरी सोडण्यासाठी ही बस  निघाली होती. यावेळी वलक्काई पुलाजवळ बस चालकाचे उतारावरुन बस चालवत असताना नियंत्रण सुटले. यामुळे बस उलटली. या घटनेचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. नेध्या एस राजेश असे तिचे नाव असून ती पाचवीत शिकत होती. तर बसमधील इतर 14 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रशासनाने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून वाहतूक विभागाला सुरक्षिततेसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.